Take the money, but do the road work. : पैसे घ्या पण रस्त्याचं काम करा

चिखली प्रतिनिधी :
चिखली-जाफ्राबाद मार्गावरील डॉ. काळुसे हॉस्पिटल ते आमराई दरम्यानच्या तब्बल २.५० कोटी रुपयांच्या व्हाईट टॉपिंग रस्त्याच्या कामात झालेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना नेते ओमराजे मदनराजे गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संतप्त नागरिकांनी जोरदार आंदोलन छेडले. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत थेट कार्यालयासमोर पैसे उधळले आणि ढोल-ताशे, ढफ वाजवत भ्रष्टाचाराविरोधात एल्गार पुकारला.
“जनतेचा पैसा धुळीत, भ्रष्ट अधिकाऱ्यांची खैर नाही!”, “रस्ते द्या, अन्यथा खुर्च्या सोडा!” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. प्रशासनाला जाग आणण्यासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनाची जिल्हाभरात जोरदार चर्चा रंगली.
धुळीच्या साम्राज्यामुळे अपघातांची मालिका
चिखली-जाफ्राबाद हा तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग आहे. मात्र रखडलेले काम, निकृष्ट दर्जाची बांधकाम प्रक्रिया आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण परिसर धुळीच्या विळख्यात सापडला आहे. वाहनचालकांना समोरील रस्ता दिसेनासा होत असून अनेक लहान-मोठे अपघात घडत आहेत. विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
“रस्ता अपूर्ण असताना २.५० कोटी रुपयांचे बिल कोणाच्या आशीर्वादाने अदा करण्यात आले?” असा संतप्त सवाल ओमराजे गायकवाड यांनी उपस्थित केला.
RTI माहिती दडपण्याचा गंभीर आरोप
या प्रकरणातील तांत्रिक त्रुटी आणि आर्थिक गैरव्यवहार बाहेर येऊ नयेत म्हणून माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवलेली माहिती जाणीवपूर्वक रोखण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. अर्जदारांना मानसिक त्रास देणे, सुनावण्या लांबणीवर टाकणे आणि माहिती न देणे हा प्रकार लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे आंदोलकांनी म्हटले.
प्रमुख मागण्या
– रस्त्याचे रखडलेले काम पावसाळ्यापूर्वी तातडीने पूर्ण करावे.
– निकृष्ट कामाला मंजुरी देणाऱ्या आणि माहिती दडपणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे.
– संबंधित कंत्राटदाराकडून २.५० कोटी रुपयांची वसुली करून त्याला काळ्या यादीत टाकावे.
– संपूर्ण प्रकरणाची ACB व लोकआयुक्तांमार्फत चौकशी कराव.
१५ दिवसांत कारवाई नाही तर भीक मागू
आंदोलनादरम्यान ओमराजे गायकवाड यांनी प्रशासनाला थेट अल्टिमेटम दिला. “येत्या १५ दिवसांत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरून भीक मागू. त्या भीकेतून जमा झालेले पैसे जिल्हाधिकाऱ्यांना देऊ आणि त्यांनी ते पैसे वापरून रस्ते पूर्ण करावेत,” असा संतप्त इशारा त्यांनी दिला.
यावेळी उपस्थित नागरिकांनीही प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. १५ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास पुढील आंदोलन अधिक उग्र स्वरूपात करण्यात येईल, असा इशारा देत आंदोलनाची सांगता करण्यात आली.


