Theft of water from a public well under the cover of darkness comes to light : किनगाव जट्टू येथे तीव्र पाणीटंचाईच्या काळात रात्रीच्या अंधारात सार्वजनिक विहिरीवरून पाणी चोरीचा प्रकार उघडकीस

अमोल साळवे
मलकापूर पांग्रा दि १८ : सध्या संपूर्ण परिसरात तीव्र पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. एक एक थेंब मिळवण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असतानाच, लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथे एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. गावातील एका नागरिकाकडून सार्वजनिक विहिरीवर मोटार पंप टाकून वैयक्तिक वापरासाठी बेकायदेशीरपणे पाणी उपसा केला जात असल्याचे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आले आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत किनगाव जट्टू ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित व्यक्ती असलेल्या अतुल बंडू राऊत (रा. किनगाव जट्टू) यांना तात्काळ अधिकृत नोटीस बजावली आहे. ग्रामपंचायतीने जारी केलेल्या नोटिशीमध्ये नमूद केल्यानुसार, यापूर्वीही याच व्यक्तीकडून सार्वजनिक विहिरीमध्ये मोटार पंप टाकून पाण्याचा अवैधरित्या उपसा केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या हस्तक्षेपानंतर हा प्रकार तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आला होता.
मात्र, पाण्याची वाढती गरज आणि तीव्र टंचाईचा फायदा घेत, संबंधित व्यक्तीने पुन्हा एकदा रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत आपल्या घरसमोरील सार्वजनिक विहिरीवर मोटार पंप टाकून पाण्याचा बेकायदेशीर उपसा सुरूच ठेवल्याचे ग्रामपंचायतीच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे.
यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावात दवंडी पिटवून तसेच तोंडी सूचना देऊन, सार्वजनिक विहिरींवर अथवा स्रोतांवर टाकण्यात आलेले सर्व खासगी मोटार पंप स्वतःहून काढून घेण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले होते. तसेच, शासनाकडूनही पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर यासंदर्भात कडक लेखी आदेश जारी करण्यात आले आहेत, याची आठवणही नोटिशीत करून देण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीचा कडक कायदेशीर इशारा
सार्वजनिक विहिरीवरून खासगी मोटार पंपाच्या माध्यमातून सुरू असलेला पाण्याचा हा बेकायदेशीर उपसा तात्काळ थांबवावा, अन्यथा अतुल बंडू राऊत यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट आणि कडक इशारा ग्रामपंचायत प्रशासनाने दिला आहे.
सध्याच्या या भीषण पाणीटंचाईच्या काळात सार्वजनिक आणि हक्काच्या पाणीस्रोतांवर अशा प्रकारे खासगी हक्क गाजवण्याचा हा प्रकार थांबणार का? आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या या इशाऱ्यानंतर नेमकी काय कठोर कारवाई होते, याकडे आता संपूर्ण किनगाव जट्टू गावाचे व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


