Adoption orders handed over to eight children by the District Collector : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आठ बालकांना दत्तक विधान आदेश प्रदान; बालकांना मिळाला प्रेमळ कौटुंबिक आधार

बुलढाणा, दि. १७ : जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्या हस्ते नुकतीच दत्तक विधान प्रक्रियेची अत्यंत आनंदाची आणि भावूक पूर्तता पार पडली. या विशेष कार्यक्रमात एकूण आठ बालकांच्या पालकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कायदेशीर दत्तक विधान आदेश प्रदान करण्यात आले. पालकांच्या प्रत्यक्ष मुलाखतीनंतर ही मंजुरी देण्यात आली असून, या निर्णयामुळे संबंधित सर्व बालकांना एक सुरक्षित, प्रेमळ आणि हक्काचे कौटुंबिक वातावरण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या सर्वसमावेशक प्रक्रियेमध्ये संस्थेअंतर्गत दोन दत्तक विधान प्रकरणे, नातेवाईकांतर्गत चार दत्तक विधान प्रकरणे आणि सावत्र दत्तक विधानाची दोन प्रकरणे, अशा एकूण आठ प्रकरणांचा यशस्वी समावेश होता. आदेश प्रदान करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पालकांशी सविस्तर चर्चा केली. यामध्ये बालकांच्या हितसंरक्षणाची मोठी जबाबदारी, पालकांची मानसिक व सामाजिक तयारी तसेच त्यांच्याकडील संगोपनाच्या क्षमतेबाबत सखोल माहिती घेण्यात आली. सर्व कायदेशीर बाबींची आणि कागदपत्रांची कसून पडताळणी केल्यानंतरच जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व आठ प्रकरणांना अंतिम मंजुरी देत दत्तक विधान आदेश प्रधान केले.
बालकांचे सर्वांगीण हित जपणे आणि प्रत्येक निराधार किंवा गरजवंत बालकाला हक्काच्या कुटुंबाचा भक्कम आधार मिळवून देणे, हा या संपूर्ण प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे, संरक्षण अधिकारी सागर राऊत, ‘दि लक ट्रस्ट’ या दत्तक विधान संस्थेचे व्यवस्थापक गजानन कुळकर्णी यांच्यासह संबंधित दत्तक पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
प्रकरणे निकाली काढत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर अत्यंत आत्मीयतेने पालकांशी संवाद साधला आणि उपस्थित बालकांसोबत काही वेळ आनंदात घालवला. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः बालकांना चॉकलेटचे वाटप करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सुखद आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या सुखद सोहळ्यामुळे उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.


