Luxury bus overturns on Samruddhi Expressway; one dead : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स ओव्हरटेक करण्याच्या नादात उलटली. यात एका प्रवाशाचा बळी गेला. तसेच सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताच्या सत्रांना ब्रेक लागेना

डोणगाव : समृद्धी महामार्गावर अपघातांच्या घटनांना अद्याप ब्रेक लावण्यात शासनास अपयश आल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे कुठे ना कुठे दिसून येत आहे. नुकताच मेहकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लक्झरी बसला भीषण अपघात झाला. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स ओव्हरटेक करण्याच्या नादात उलटली. यात एका प्रवाशाचा बळी गेला. तसेच सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस महामार्गाच्या दुभाजकावर (डिव्हायडर) जाऊन आदळली. ही घटना २५ नोव्हेंबर मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास घडली. गौरव पांडे असे या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. तर, शिवानंद हांचिनायटी (वय ३५, रा. नागपूर) असे अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स चालकाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नागपूर येथून प्रवाशांना घेऊन खासगी ट्रॅव्हल्स बस (क्रमांक एमएच ०९ जीजे ७३१५) मुंबईच्या दिशेने जात होती. दरम्यान, मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास मेहकर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक २९६.०५ (मुंबई कॉरिडॉर) येथे आली असता, चालक शिवानंद याने समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी समोरील वाहनाला धडक बसल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव बस बाजूच्या लोखंडी दुभाजकावर धडकून दोन्ही डिव्हायडरच्या मधोमध जाऊन अडकली.
हा अपघात इतका भीषण होता की, बसमध्ये असलेले प्रवासी गौरव पांडे हे डाव्या बाजूला बाहेर फेकले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच बसमधील इतर ५ ते ६ प्रवासी गंभीर झाले. काहींना किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघाताची माहिती छत्रपती संभाजीनगर येथील नियंत्रण कक्षातून (CRO) मिळताच वाकी समृद्धी महामार्ग उपकेंद्राचे ए. एस. मंगेश खडसे आणि हवालदार आराख, पोलीस कर्मचारी आणि एमएसएफच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी हलवून महामार्गावर तातडीने बॅरिकेडिंग केले आणि विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात पुढील कार्यवाही सुरू आहे.


