Inauguration of Babasaheb Ambedkar Advocate Training and Research Center : भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई येथे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर’चे उदघाटन करण्यात आले.

न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणाकडे एक ठोस पाऊल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई येथे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर’चे उदघाटन करण्यात आले. न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणाकडे हे एक ठोस पाऊल आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकॅडमीची पाहणी करताना उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांची विशेष आठवण झाल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकामांच्या दर्जाबाबत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचा असलेला काटेकोर दृष्टिकोन आणि गुणवत्तेचा आग्रह नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा’चे अभिनंदन करत सांगितले की, महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या जागेचा अत्यंत प्रभावी आणि दर्जेदार वापर करण्यात आला आहे. अवघ्या एका वर्षात पूर्ण झालेल्या या इमारतीतील वर्गखोल्या, ऑडिटोरिअम आणि प्रशिक्षण सुविधा या सर्व बाबी उच्च दर्जाच्या असून, या संकल्पनेमागील नियोजन आणि अंमलबजावणी उल्लेखनीय आहे, असे त्यांनी नमूद केले.

कायद्याचे औपचारिक शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कार्यपद्धती यातील अंतर कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रशिक्षण संस्थेची नितांत गरज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. नव्या न्याय, दंड आणि साक्ष संहितेच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित वकिलांची निर्मिती, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि संशोधनाला चालना देणारे हे केंद्र न्यायव्यवस्थेची गुणवत्ता वाढविण्यास मोलाची भूमिका बजावेल, असे ते म्हणाले.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व मान्यवर उपस्थित होते.
प्रेरणा घेऊन राज्यभर अकॅडमी
या उपक्रमातून प्रेरणा घेऊन देशातील इतर राज्यांमध्येही अशा स्वरूपाच्या अकॅडमी उभारल्या जातील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.


