Celebrate Mata Ramai Jayanti at the government level : शासकीय स्तरावरून माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुजित बांगर यांनी केली आहे.

सुजित बांगर यांची मागणी
संग्रामपूर : भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षामध्ये माता रमाईंचा मोठा वाटा आहे. रमाईंचा त्याग, संघर्ष हा जनसामान्यात पोहोचावा, याकरिता शासकीय स्तरावरून माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुजित बांगर यांनी केली आहे.
यासंदर्भात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. दरवर्षी ७ फेब्रुवारी रोजी माता रमाई आंबेडकर यांची जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. परंतु शासकीय स्तरावर अधिकृतरित्या ही जयंती साजरी होत नाही. त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी केल्यास विद्यार्थी सामान्य लोकांमध्ये माता रमाईंचा आदर्श, त्याग, समर्पणाची भावना ही देशाच्या जडणघडणीसाठी प्रेरणादायी ठरेल. प्रतिकूल परिस्थितीमध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षण व आपल्या परिवारासाठी कष्ट करून आदर्श निर्माण करणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाईंचा इतिहास या निमित्ताने जगासमोर येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देताना सुजित बांगर, पंकज शेगोकार, अरुण निंबोळकर, रज्जाक सुरत्ने, अकबर सुरत्ने, विकास खंडेराव, गौरमराव वानखडे, प्रकाश डोंगरदिवे उपस्थित होते.

