Artificial rain in the state, including Buldhana district. : बुलडाणा जिल्ह्यासह राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग राबविण्यात यावा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची मुख्यमंत्री यांचेकडे मागणी

बुलढाणा (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये, विशेषतः बुलढाणा जिल्ह्यात, पावसाने दडी मारल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कृत्रिम पर्जन्य (Cloud Seeding) प्रयोगाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. ५ सप्टेंबर २०२६ रोजी ईमेलद्वारे पाठवलेल्या एका लेखी निवेदनात त्यांनी ही मागणी केली आहे.
चिंताजनक पर्जन्यमान आणि पिकांवरील संकट
गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी सध्याचा पाऊस अत्यंत महत्त्वाचा असतो. पावसाचा खंड असाच कायम राहिल्यास पिकांवर, जलसाठ्यांवर आणि भूजल पुनर्भरणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अहवालानुसार, २ सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यातील पर्जन्यमान सामान्यपेक्षा सुमारे ८७ टक्के कमी नोंदवले गेले आहे. इतकेच नाही, तर २ ते ३ सप्टेंबरदरम्यानच्या २४ तासांत बुलढाणा येथे पावसाची नोंद झालेली नाही, ही बाब जिल्ह्यातील सद्यस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करते. जर लवकर पाऊस पडला नाही, तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती आहे.
आधुनिक वैज्ञानिक उपायांची गरज
या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने पारंपरिक उपाययोजनांसोबतच आधुनिक वैज्ञानिक आणि तांत्रिक पर्यायांचाही तातडीने विचार करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय मंत्री जाधव यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. कृत्रिम पर्जन्य निर्मिती (Cloud Seeding) हा त्यापैकीच एक संभाव्य पर्याय आहे. जरी या प्रक्रियेद्वारे पाऊस पडण्याची निश्चित हमी नसली तरी, विशिष्ट प्रकारचे ढग, पुरेशी आर्द्रता आणि अनुकूल वातावरणीय परिस्थिती असल्यास हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे, भारतीय हवामान विभाग (IMD), भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) आणि संबंधित तज्ज्ञ संस्थांच्या मार्गदर्शनाखाली याची तांत्रिक व्यवहार्यता तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
तात्काळ कार्यवाहीची मागणी
महाराष्ट्रातील सद्यस्थिती पाहता, अनुकूल ढग आणि वातावरणीय परिस्थिती उपलब्ध असल्याची माहिती आहे. त्यामुळे, बुलढाणा जिल्ह्यासह पावसाने दडी मारलेल्या विदर्भ आणि राज्यातील इतर आवश्यक भागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत (Cloud Seeding) तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहे. ५ सप्टेंबर रोजी त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अनेक भागांचा दौरा करून पीक परिस्थितीची पाहणी केली होती, ज्यामुळे त्यांना या समस्येची गांभीर्यता अधिक जवळून समजली. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेच्या संरक्षणासाठी या तातडीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे.


