Brides father dies at Kanyadaan : लग्न सोहळा मंगलमय वातावरणात पार पडल्यानंतर मुलीचे कन्यादान करतानाच वधूपित्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

हृदयविकाराने मृत्यू : वर्दडी येथील घटना : लग्नघरी दु:खाचे सावट
बुलढाणा : लग्न सोहळा मंगलमय वातावरणात पार पडल्यानंतर मुलीचे कन्यादान करतानाच वधूपित्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आनंदी वातावरणात क्षणात दु:खात बदलले. सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी बुद्रूक येथे १२ मे रोजी सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
कुरूमदास कुंडलीक भुतेकर (वय ५०) असे या मृत दुर्दैवी पित्याचे नाव आहे. मुलगी नंदिनीचा विवाह संबंध जालना जिल्ह्यातील आर्डा (तोलाजी) येथील नानोटे कुटुंबातील मुलाशी जुळला. वधू व वर पक्षाकडील मंडळीने लग्नाची तयारी केली. वधू पित्याने मुलीचा विवाह थाटात लावण्यासाठी मोठे कष्ट घेतले. १२ मे रोजी दुपारी वर्दडी बुद्रूक येथे विवाह सोहळा उत्साहात पार पडला. पाठवणीपूर्वी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कन्यादान विधी सुरू झाला. मुलगी नंदिनीचे कन्यादान करीत असताना अचानक कुरूमदास भुतेकर यांच्या छातीत तीव्र कळ आली आणि ते जागीच कोसळले. हृदयविकाराचा झटका आल्याचे लक्षात येताच सिंदखेड राजा येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.
२६ डिसेंबर रोजी त्यांच्या आईचे निधन झाले. त्याच महिन्यात हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मुलगा विशालचा विवाह २१ एप्रिल रोजी पार पडली. एकवीस दिवसांच्या अंतराने मुलीचा विवाह लावण्यात आला. या घटनेने भुतेकर व नानोटे परिवारावर शोककळा पसरली.


