mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बुलढाणा जिल्ह्याचे सीईओ संग्राम अभियान महाराष्ट्रासाठी दिशादर्शक : Buldhana District CEO’s ‘Sangram Abhiyan’ serves as a guiding model for Maharashtra.

शेअर करा :

Buldhana District CEO’s ‘Sangram Abhiyan’ serves as a guiding model for Maharashtra. : बुलढाणा जिल्ह्याचे ‘सीईओ संग्राम अभियान’ महाराष्ट्रासाठी दिशादर्शक: दुर्गम गावांच्या विकासाचा नवा अध्याय

Buldhana District CEO's 'Sangram Abhiyan' serves as a guiding model for Maharashtra.


बुलढाणा, दि. १४: बुलढाणा जिल्हा परिषदेने दुर्गम, आदिवासीबहुल आणि डोंगराळ भागातील ग्रामपंचायतींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू केलेले ‘सीईओ संग्राम अभियान (संवेदनशील ग्राम)’ हे महाराष्ट्रासाठी एक दिशादर्शक आणि अभिनव पाऊल ठरले आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी गर्दे वाचनालय येथे आयोजित कार्यक्रमात केले. या अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ११० ग्रामपंचायतींचा प्रत्येकी ५१ हजार रुपये देऊन गौरव करण्यात आला. याच सोहळ्यात जिल्हा परिषदेच्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या ‘मिशन झेड (ZEDD)’ आणि मोफत स्पर्धा परीक्षा वर्गांचेही त्यांनी भरभरून कौतुक केले.
Buldhana District CEO's 'Sangram Abhiyan' serves as a guiding model for Maharashtra.
या विशेष गौरव सोहळ्याला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, आमदार मनोज कायंदे, आमदार सिद्धार्थ खरात, नगराध्यक्षा पूजा गायकवाड, ॲड. नाझर काझी, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विकासकामांना गती आणि ग्रामपंचायतींचा सन्मान

पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, सीईओ संग्राम अभियानांतर्गत झालेल्या श्रमदानातून आणि लोकसहभागातून गावांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत थेट सहभागी होऊ न शकणाऱ्या दुर्गम गावांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (सीईओ) राबविलेला हा स्वतंत्र उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. या अभियानात २०० पेक्षा जास्त गावांपैकी ११० उत्कृष्ट ग्रामपंचायतींची निवड करून त्यांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याकामी एकूण ५६.१० लाख रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले. यात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या सिंदखेड राजा तालुक्यातील ‘शेंदुर्जन’ ग्रामपंचायतीचा मंचावर विशेष गौरव करण्यात आला.

‘मिशन ZED’ आणि मोफत ‘नीट-जेईई’ वर्गांचा शुभारंभ

या शानदार सोहळ्यात शिक्षण क्षेत्रातील ‘मिशन झेड (ZED)’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे पालकमंत्र्यांकडून विशेष कौतुक करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेत असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘नीट (NEET)’, ‘जेईई (JEE)’ आणि ‘सीईटी (CET)’ चे मोफत मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत १०० विद्यार्थी या वर्गांचा लाभ घेत असून ते सुस्थितीत शिक्षण घेत आहेत. या महत्त्वपूर्ण उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील गरीब आणि होतकरू विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमधून उज्ज्वल यश संपादन करून आपले भविष्य घडवतील, असा ठाम आशावाद पालकमंत्री मकरंद पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

मनरेगा आणि लोकसहभागातून सर्वांगीण विकासाचे आवाहन

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी ‘सीईओ संग्राम’ या कार्यक्रमात बोलताना ‘मनरेगा’ आणि लोकसहभागातून गावांचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्याचे आवाहन केले. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही मनरेगाअंतर्गत उपलब्ध निधीचा आणि ६०:४० या प्रमाणाचा अचूक समन्वय साधून गावांमध्ये उत्तम दर्जाची ग्रामपंचायत भवने, अंगणवाड्या, शाळेच्या खोल्या आणि महिला बचत गटांसाठी सुसज्ज सभागृहे उभारण्यावर अधिकाधिक भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र हे आर्थिकदृष्ट्या अत्यंत प्रगत राज्य असून, या प्रगतीला अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन ग्रामीण भागाला अधिक सक्षम करण्याची मोठी संधी आपल्याकडे उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान’ यांसारख्या विकास योजनांमध्ये नागरिकांचा वाढता सहभाग ही राज्यासाठी अत्यंत सकारात्मक बाब असल्याचे सांगत त्यांनी गाव पातळीवर चालणाऱ्या विकासकामांचे कौतुक केले. अनेक गावे लोकवर्गणी आणि शासकीय योजनांची योग्य सांगड घालून विकासाच्या स्पर्धेत यशस्वी वाटचाल करत आहेत, ही बाब राज्याच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. याच धर्तीवर इतरही गावांनी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा अभियानांमध्ये हिरीरीने सहभागी व्हावे, असा विश्वास केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त करून ग्रामविकासाच्या चळवळीला गती देण्याचे आवाहन केले.

यावेळी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थी मित्रांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व त्यांच्या पुढील वाटचालीस प्रोत्साहन देण्यात आले. भविष्यात बुलढाणा जिल्हा परिषद राज्याच्या सर्व उपक्रमांमध्ये प्रथम क्रमांकावर राहील, अशी अपेक्षाही मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मोहन, प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) शिवशंकर भारसाकळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा प्र वि.) आशिष पवार, मुलेविअ प्रकाश राठोड, समाजकल्याण अधिकारी प्रमोद एंडोले, कार्यकारी अभियंता सुशील गुडदे, कार्यकारी अभियंता स्नेहल माने, शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top