mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

लोणारमध्ये ‘डार्क स्काय’ खगोल दर्शन महोत्सवाची सुरुवात : Dark Sky Astronomy

शेअर करा :

Dark Sky Astronomy : जागतिक वारसा स्थळ असलेल्या लोणार सरोवर येथे महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच ‘डार्क स्काय’ आणि अँस्ट्रोएरा यांच्या संयुक्त विद्यमाने खगोल दर्शन महोत्सवाला २४ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे.


कृष्ण आकाशातून ताऱ्यांचे अप्रतिम दर्शन

Dark Sky Astronomy


मयूर गोलेच्छा


लोणार : जागतिक वारसा स्थळ असलेल्या लोणार सरोवर येथे महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच ‘डार्क स्काय’ आणि अँस्ट्रोएरा यांच्या संयुक्त विद्यमाने खगोल दर्शन महोत्सवाला २४ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. या उपक्रमाअंतर्गत भव्य टेलिस्कोपच्या माध्यमातून नागरिकांना कृष्ण आकाशातील तारे, ग्रह आणि आकाशगंगेचे थेट निरीक्षण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या पार्श्वभूमीवर लोणार येथील पर्यटन संकुलात आयोजित पत्रकार परिषदेत महोत्सवाची सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी ‘डार्क स्काय’च्या श्वेता कुलकर्णी, एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अ‍ॅस्ट्रोस्पेस विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औधकर, एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक योगेश निर्गुडे, व्यवस्थापक अक्षय गायकर व सदानंद दाभाडे उपस्थित होते.

दरम्यान श्वेता कुलकर्णी यांनी सांगितले की, ‘डार्क स्काय’ म्हणजे असा परिसर, जिथे रात्रीचे आकाश अत्यंत स्वच्छ, नैसर्गिक आणि कृत्रिम प्रकाशप्रदूषण (Light Pollution) अत्यल्प असते. अशा ठिकाणी आकाशगंगा, तारे, ग्रह आणि उल्का अत्यंत स्पष्टपणे पाहता येतात. राज्यातील अनेक भागांमध्ये वाढत्या प्रकाशप्रदूषणामुळे आकाश निरीक्षण मर्यादित झाले आहे. त्यामुळे रायगड आणि लोणार या दोन निवडक ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या महोत्सवासाठी २४, २५ आणि २६ एप्रिल दरम्यान लोणार शहरातील सार्वजनिक विद्युत व्यवस्था सायंकाळी काही काळ पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे आकाश अधिक गडद व स्वच्छ दिसेल आणि खगोलप्रेमींना आकाशातील खगोलीय घटनांचे स्पष्ट दर्शन घेता येईल. लोणारसारख्या नैसर्गिक व कमी प्रकाशप्रदूषण असलेल्या भागात ‘डार्क स्काय’ उपक्रमाचे विशेष महत्त्व आहे. या माध्यमातून लोणारला ‘डार्क स्काय साइट’चा दर्जा मिळण्याची शक्यता असून, यामुळे ‘अ‍ॅस्ट्रो टुरिझम’ला मोठी चालना मिळणार आहे. देश-विदेशातून खगोलप्रेमी येथे येऊन आकाश निरीक्षण करतील, ज्यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वाचा आहे. अधिक कृत्रिम प्रकाशामुळे पक्षी, प्राणी आणि कीटकांच्या नैसर्गिक जीवनचक्रावर विपरीत परिणाम होतो. ‘डार्क स्काय’ संकल्पना या सजीवांना नैसर्गिक अंधाराचे वातावरण उपलब्ध करून देते, ज्यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होते.

यावेळी एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी सांगितले की लोणार हे केवळ वैज्ञानिकदृष्ट्या नव्हे, तर खगोलीय दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. एमटीडीसीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, लोणार येथे जागतिक दर्जाची प्रयोगशाळा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

तसेच, परिसरातील जैवविविधता आणि नैसर्गिक सौंदर्य जपून पर्यटनविकासाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक तसेच पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे आणि एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश वटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात आणखी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या ‘डार्क स्काय’ महोत्सवामुळे लोणारची ओळख जागतिक स्तरावर अधिक दृढ होणार असून, विज्ञान व पर्यटन यांचा सुंदर संगम अनुभवण्याची अनोखी संधी नागरिकांना मिळणार आहे.

 

डार्क स्काय (Dark Sky) म्हणजे काय?

डार्क स्काय म्हणजे असा परिसर जिथे रात्री आकाश अत्यंत स्वच्छ, नैसर्गिक आणि कृत्रिम प्रकाश प्रदूषण (Light Pollution) खूप कमी असतो. अशा ठिकाणी आकाशातील तारे, आकाशगंगा (Milky Way), ग्रह, उल्का इत्यादी अत्यंत स्पष्ट दिसतात. म्हणजे प्रकाश प्रदूषण नसलेले, खरेखुरे रात्रीचे आकाश.

 

डार्क स्काय का महत्त्वाचे आहे?

खगोल निरीक्षणासाठी उत्तम

वैज्ञानिक, खगोलप्रेमी आणि फोटोग्राफर्सना तारे आणि ग्रह स्पष्टपणे पाहता येतात.

 

पर्यावरणासाठी फायदेशीर

जास्त कृत्रिम प्रकाशामुळे पक्षी, प्राणी आणि कीटकांच्या जीवनचक्रावर परिणाम होतो. डार्क स्काय त्यांना नैसर्गिक वातावरण देते.

 

पर्यटन वाढते

अशा ठिकाणी “Astro Tourism” वाढतो — लोक खास आकाश निरीक्षणासाठी येतात.

 

ऊर्जा बचत

अनावश्यक लाईट कमी केल्यामुळे वीज वाचते.

 

डार्क स्काय क्षेत्र (Dark Sky Reserve) म्हणजे काय?

हे असे अधिकृत क्षेत्र असते जिथे प्रकाशप्रदूषण कमी ठेवण्यासाठी नियम केलेले असतात.

भारतामध्ये उदाहरण

लडाखमधील हानले (Hanle) — भारतातील पहिलं डार्क स्काय रिझर्व्ह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top