Eight licenses for sale of fertiliser suspended : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा परवाना अधिकारी संतोष डाबरे यांनी जिल्ह्यातील आठ रासायनिक खत विक्री परवाने निलंबित केले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांचा दणका : नियम डावलणाऱ्या कृषी केंद्रधारकांमध्ये खळबळ
बुलढाणा : गुणनियंत्रण निरीक्षकांनी केलेल्या तपासणीत अनियमतता आढळून आल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा परवाना अधिकारी संतोष डाबरे यांनी जिल्ह्यातील आठ रासायनिक खत विक्री परवाने निलंबित केले. तसेच दोन खत परवान्यांबाबत कृषी केंद्रसंचालकांना सक्त ताकीद देण्यात आली.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना खताची कमतरता भासू नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. कृत्रिम खतटंचाई निर्माण करणे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला होता. त्याअनुषंगाने खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्राची कृषी विभागाच्या पथकांकडून तपासणी केली जात आहे. तपासणीदरम्यान त्रुटी आढळलेल्या कृषी सेवा केंद्र चालकांचे खत परवाने निलंबित करण्यात आले आहे.

कृषि केंद्र धारकांनी अनुदानीत रासायनिक खते विक्री करताना खरेदीदार शेतकऱ्यांचे ई-पॉस मशीनवर नोंद घेऊन विक्री करणे व त्या शेतकऱ्यांना पक्के बिल देणे अपेक्षित असताना परवानाधारकांनी नियम डावलल्याचे दिसून आले. तसेच साठा पुस्तक अद्ययावत न ठेवणे, देयकावर शेतकऱ्यांची स्वाक्षरी नसणे व इतर कारणामुळे खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
आणखी बातम्या वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा https://mahadesha.com/
जिल्ह्यातील परवानाधारक खते विके्रत्यांनी नियमानुसार रासायनिक खत विक्री करावे; अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा कृषी अधीक्षक संतोष डाबरे यांनी दिला आहे.


