Fraud against the government involving ‘Khanvis’; case finally registered against Samadhan Tathe. : खंविस सह शासनाची फसवणूक; समाधान ताठेविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

नियमबाह्य ज्वारी खरेदी-विक्री केल्याप्रकरणी कारवाई
बुलढाणा, दि. २८ (प्रतिनिधी)
………………………………
सातबाऱ्यामध्ये खोडतोड करून अत्यल्प क्षेत्रावर जास्तीत जास्त ज्वारीचे उत्पादन घेतल्याचे दाखवत खरेदी विक्री संस्थेला लाखो रुपयांची ज्वारी विकल्याप्रकरणी अखेर जांब येथील शेतकरी तथा व्यापारी समाधान लक्ष्मण ताठे याच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
समाधान ताठे याने बनावट सातबारा जोडून खरेदी विक्री संस्था आणि शासनाची फसवणूक केल्याची गंभीर बाब उघडकीस आल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. नियमबाह्य ज्वारी खरेदी करणाऱ्या ताठे याने अनेक शेतकऱ्यांच्या नावांचे सातबारा जोडून अशा पद्धतीने ज्वारी विक्रीचा गोरखधंदा सुरू केल्याची चर्चा होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी केल्यास विविध प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता आहे.
बुलढाणा तालुका शेतकी खरेदी विक्री संस्थेचे प्रभारी व्यवस्थापक संदीप कांबळे यांनी पोलीस अधीक्षकांसह शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. हे प्रकरण पोलीस दरबारी रेंगाळले होते. अखेर उशिरा का होईना या प्रकरणात समाधान ताठेविरुद्ध बीएनएस कलम ३१८ (४), ३३६ (३), ३४० (२) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
खरेदी विक्री संस्था शासकीय हमी भाव योजनेअंतर्गत पणन महासंघाचे सब एजंट म्हणून माल खरेदी करते. शेतकऱ्यांकडून मालाची विक्री करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने व संस्थेने ठरवून दिलेल्या केंद्रावर नोंदणी केल्या जाते. २०२४-२५ या रब्बी, खरीप व उन्हाळी हंगामासाठी शासकीय हमी भावानुसार ज्वार खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या नावाची नोंदणी करण्यात आली होती. नोंदणीमध्ये समाधान ताठे या शेतकऱ्याने त्याच्या जांब येथील गट नंबर २१५ मधील संस्थेस पुरविलेल्या सातबारा उतारानुसार ज्वार पेरणी क्षेत्र जवळपास पीकपेरा हा २.०४ व २.६० असा ४.६४ हेक्टर आर एवढा दर्शविला. संस्थेचे नोंदणी एजंट शिवशक्ती मल्टीसर्व्हिसेसचे नीलेश खडके यांनी समाधान ताठे याचे क्षेत्र २.२९ हेक्टर आर एवढे असल्याने तेवढ्याच क्षेत्राची ज्वार खरेदी करण्यासाठी नोंदणी त्या गटामध्ये केली होती. तसेच ज्वार खरेदी सुरू झाल्यानंतर समाधान ताठे याने संस्थेकडे ४१ क्विंटल ज्वारी विक्री केली. यामध्ये जांब येथील गट नंबर ९४ मधील ०.१५ आर शेतजमिनीचासुद्धा समावेश आहे.
तहसीलदार, पणन अधिकाऱ्यांच्या चौकशीतही दोषी
एका तक्रारकर्त्याने समाधान ताठेविरुद्ध बुलढाणा तहसीलदारांकडे तर दुसऱ्या व्यक्तीने जिल्हा पणन अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. जांब येथील गट नंबर २१५ च्या सातबारा उतारामधील पीक पेरा क्षेत्रामध्ये छेडछाड करून खोटा पीकपेरा बनवून खरेदी विक्री संस्थेची दिशाभूल करून जास्तीचा पीकपेरा दर्शवून शासनाला जास्त ज्वारी विक्री केल्याचे नमूद केले. तहसीलदार व पणन अधिकाऱ्यांच्या चौकशीतही ताठे याने फसवणूक केल्याचे सिद्ध झाले. चौकशीअंती पोलिसांत तक्रार देण्यात आली.


