Friction of wires; an acre of wheat burned : साब्रा येथे ५ मार्चच्या सकाळी दहा वाजता विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन उभा गहू जळून मोठे आर्थिक नुकसान झाले.

शेतकऱ्याची मेहनत वाया
मेहकर : रात्रंदिवस काबाडकष्ट करून एका एकरात गव्हाचे पीक पिकविले. मात्र, क्षणार्धात विजेचे संकट कोसळले आणि शेतकऱ्याच्या संपूर्ण मेहनतीवर पाणी फेरले. साब्रा येथे ५ मार्चच्या सकाळी दहा वाजता विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन उभा गहू जळून मोठे आर्थिक नुकसान झाले.
मेहकर तालुक्यातील साब्रा शिवारात लक्ष्मण तुकाराम वानखेडे यांचे शेत आहे. त्यांनी एका एकरात गव्हाचे पीक पेरले होते. त्यांच्या शेतातून वीज वाहिनी गेली आहे. तारा सैल आणि लोंबकळलेल्या होत्या. हवेच्या जोराने तारांचे घर्षण होऊन गव्हाच्या पिकात ठिणग्या पडल्या. क्षणार्धात वाळलेल्या गव्हाने पेट घेतला. आगीचे मोठे लोळ उठले. अन्य शेतांमध्ये ही आग पसरत जाणार होती. परिसरातील शेतकऱ्यांनी धावपळ करीत आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. वीजपंप सुरू करून पाण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे ही आग इतरत्र पसरू शकली नाही. शेजारील शेतकऱ्यांची पिके या घटनेपासून वाचली. शेजारीच गहू व हरभऱ्याची पिके होती. आग विझविण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. लक्ष्मण वानखेडे यांचा एकरभर गहू जळून खाक झाला आहे. महावितरण कंपनीने तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.


