Jijaus daughter Sandhya Ingle honoured with state-level award on International Womens Day :

बुलढाण्याची मान उंचावली
बुलढाणा : जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना गौरविण्यासाठी आयोजित विशेष कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्यातील जीवनधारा शैक्षणिक क्रीडा व बहुउद्देशीय महिला मंडळ या संस्थेचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा संध्याताई इंगळे यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते संध्याताई इंगळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर उपस्थित होत्या.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी संस्थेमार्फत सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी महिला सन्मान पोर्टलचे अनावरण करण्यात आले तसेच सायबर वेलनेस कक्षाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितुताई तावडे, आमदार कायंदेताई, महिला अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाशी संलग्न असलेल्या विविध महिला संघटना, महिला मंडळांच्या पदाधिकारी व असंख्य महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर संध्याताई इंगळे यांनी या सन्मानामुळे महिलांसाठी आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली. तसेच जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय बुलढाणा आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई यांचे त्यांनी आभार मानले.
धार्मिक, सामाजिक कार्यात नेहमी सहभागी होणाऱ्या संध्याताई इंगळे यांना हा मान मिळाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आहे.


