Nurses unite against unfair transfers : सार्वजनिक आरोग्य विभागातील परिचारिकांच्या प्रशासकीय बदल्यांच्या निर्णयाविरोधात आज जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनच्या हाकेला प्रतिसाद देत जिल्ह्यातील प्रमुख वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांमधील शेकडो परिचारिकांनी जोरदार निदर्शने केली.

रुग्णालयांसमोर जोरदार निदर्शने
बुलढाणा : सार्वजनिक आरोग्य विभागातील परिचारिकांच्या प्रशासकीय बदल्यांच्या निर्णयाविरोधात आज जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनच्या हाकेला प्रतिसाद देत जिल्ह्यातील प्रमुख वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांमधील शेकडो परिचारिकांनी जोरदार निदर्शने केली.
राजमाता जिजाऊ वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, शेगाव येथिील सामान्य रुग्णालय, सिंदखेड राजा, वरवट बकाल, देऊळगाव राजा, लोणार, मोताळा येथील ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व उपकेंद्र स्तरावरील आरोग्य संस्थांमधील परिचारिका या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
अधिकाधिक बातम्या वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 👉https://mahadesha.com/category/buldhana/
बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयासमोर झालेल्या मुख्य निदर्शनावेळी परिचारिकांनी प्रशासकीय बदल्या रद्द करा, रुग्णसेवेत अडथळे आणू नका अशा घोषणा दिल्या. परिचारिका संवर्ग हा प्रामुख्याने महिलांचा असून, या अन्यायकारक बदल्यांमुळे त्यांचे कौटुंबिक स्थैर्य धोक्यात आले आहे. मुलांचे शिक्षण आणि वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी असताना अशा बदल्या करणे हे अमानवीय असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
परिचारिकांकडे कोणतीही वित्तीय जबाबदारी नसताना त्यांना प्रशासकीय बदलीच्या कक्षेत आणणे हे पूर्णपणे अतर्कसंगत आहे. रुग्णसेवा हीच आमची प्राथमिकता आहे, मात्र शासनाच्या या धोरणामुळे आमच्यावर मानसिक ताण येत आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
बदल्या त्वरित रद्द केल्या नाहीत आणि परिचारिकांना प्रशासकीय बदली प्रक्रियेतून कायमस्वरूपी वगळले नाही, तर येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्षा जयश्री वाघ, सरचिटणीस मंगेश शिरसाठ आणि फेडरेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिला
आहे.


