Terror of sword and sickle at the petrol pump : कॅनमध्ये पेट्रोल का देत नाही, या कारणावरून चार जणांनी खामगाव तालुक्यातील पिंप्राळा फाट्यावरील के.के. पेट्रोलियमवर हातात तलवार, कोयता घेऊन दहशत माजवली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

चार दहशतखोरांवर गुन्हे दाखल
खामगाव : कॅनमध्ये पेट्रोल का देत नाही, या कारणावरून चार जणांनी खामगाव तालुक्यातील पिंप्राळा फाट्यावरील के.के. पेट्रोलियमवर हातात तलवार, कोयता घेऊन दहशत माजवली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. २१ मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
सागर दिलीप अवचार (वय ३२, रा. खोलखेड, ता. खामगाव) हे के. के. पेट्रोलियम येथे कामावर होते. २१ मी रोजी रात्री साडेदहा वाजता आरोपी अमोल जाधव, अक्षय जाधव, चेतन जाधव व एक अनोळखी इसम (सर्व रा. हिंगणा कारेगाव) हे हातात तलवार व कोयता घेऊन पेट्रोल पंपावर आले. त्यांनी कॅनमध्ये पेट्रोल का देत नाही अशी विचारणा केली.
यावेळी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी सध्या फक्त एमर्जन्सी स्टॉक असून कॅनमध्ये पेट्रोल देता येणार नाही, असे सांगितल्याने आरोपी संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातातील तलवार व कोयता दाखवून दहशत निर्माण करत शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ४/२५, आर्म ॲक्ट १५ (२) तसेच बीएनएस कलम ३५२, ३५१ (२), ३ (५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास पोहेकॉ किरण राऊत हे करीत आहेत.


