mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

मलकापूर पांग्रा परिसरात फेक बिबट्याची दहशत : Panic caused by a fake leopard in the Malkapur Pangra area.

शेअर करा :

Panic caused by a fake leopard in the Malkapur Pangra area. : मलकापूर पांग्रा परिसरात ‘फेक बिबट्याची’ दहशत: वन विभागाचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Panic caused by a fake leopard in the Malkapur Pangra area.

अमोल साळवे 

मलकापूर पांग्रा:  
मलकापूर पांग्रा आणि पोफळ शिवणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या अफवांमुळे शेतकऱ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामातील पिकांची निगा राखण्यासाठी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये, विशेषतः महिला वर्गात, आणि गुरे चारणाऱ्यांमध्ये या अफवांमुळे चिंतेचे सावट पसरले आहे. मोबाईलवर व्हायरल होत असलेले बिबट्याचे व्हिडिओ आणि शेळीची लचके तोडल्याचे फोटो पाहून गोकुळ आई मंदिर परिसरातील शेतात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

या अफवांमुळे सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत: “खरंच बिबट्या आलाय का?”, “कोणाला दिसला का?”, “खरंच त्याचा आवाज येतोय?”, “त्याने शेळीचा फडशा पाडलाय?” या प्रश्नांनी परिसरातील शांतता भंग केली आहे.

या संदर्भात, महादेशा न्यूज पोर्टलचे  प्रतिनिधीने वन विभागाचे वनरक्षक अधिकारी ज्ञानेश्वर आरु यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. आरु यांनी स्पष्ट केले की, “आम्हाला इथे व्हिडिओ आणि फोटो आलेले असून, परंतु ते ‘फेक’ आहेत. अशाप्रकारे बिबट्या या परिसरात सध्या तरी नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, ग्रामस्थ जे व्हिडिओ बघत आहेत, ते व्हायरल व्हिडिओ या परिसरातील नाहीत.

वन विभागाने मलकापूर पांग्रा आणि पोफळ शिवणी डोंगर शिवारात चौकशी केली असता, ज्या मेंढपाळाने व्हिडिओ काढल्याचे सांगितले जात होते, त्याने आपण असा कोणताही व्हिडिओ व्हायरल केला नसल्याचे किंवा आपल्याला बिबट्या दिसला नसल्याचे सांगितले.

शेळीची लचके तोडल्याचे जे फोटो व्हायरल होत आहेत, त्याबद्दलही आरु यांनी खुलासा केला. ते म्हणाले की, “ते फोटो वडगाव माळी येथील एका शेतकऱ्याच्या शेळीचे असून, त्यांनी तक्रारही दिली होती. पाहणी केल्यानंतर असे दिसून आले की, ती शेळी आजारी होती आणि कुत्र्यांनी तिची लचके तोडली होती.”

वन विभागाने शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. वनरक्षक ज्ञानेश्वर आरु यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. तरीही, त्यांनी सतर्क राहावे, आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी आणि काही अनुचित आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा.”

या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते की, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या माहितीची सत्यता पडताळून पाहणे किती महत्त्वाचे आहे. अफवांमुळे समाजात अनावश्यक भीती आणि गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, नागरिकांनी जबाबदारीने वागून अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top