Self-enumeration completed at Unhalkhed : जिल्ह्यात डिजिटल जनगणना मोहिमेला वेग आला असून शेगाव तालुक्यातील उन्हाळखेड हे स्वगणना पूर्ण करणारे पहिले गाव ठरले आहे.

शेगाव तालुक्यातील स्वगणना पूर्ण करणारे ठरले पहिले गाव
बुलढाणा : जिल्ह्यात डिजिटल जनगणना मोहिमेला वेग आला असून शेगाव तालुक्यातील उन्हाळखेड हे स्वगणना पूर्ण करणारे पहिले गाव ठरले आहे. गावातील तब्बल २० कुटुंबाची स्वगणना एका दिवसात पूर्ण करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या डिजिटल स्वगणना मोहिमेला उन्हाळखेड गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून ही कामगिरी शक्य झाली.
या मोहिमेच्या यशासाठी तहसीलदार प्रज्ञा काकडे यांनी स्वतः संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार संतोष कानडे, ऋतुजा पारखे, विजय सुरडकर मंडळ अधिकारी राजेश राठोड, ग्राम महसूल अधिकारी नितीन जुमळे, महसूल सेवक सहदेव साठे, संगणक ऑपरेटर यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम केले. ग्रामस्थांनी या प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाला सहकार्य केले. यामध्ये गावातील नागरिक विलास ढवळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तालुक्यातील इतर गावातील नागरिकांनीही १५ मे पर्यंत स्वगणना प्रक्रिया पूर्ण करून डिजिटल मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसीलदार प्रज्ञा काकडे यांनी केले आहे.


