Superstition increased the status of the hypocrites : भोंदूबाबा अशोक खरातसह बुवाबाबांचे प्रस्थ वाढविण्याचे काम फडणवीस सरकारने केले आहे, असा गंभीर आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला.

अंनिसचे प्रा. श्याम मानव यांचा बुलढाण्यात आरोप
बुलढाणा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र आणि समाजात अंधश्रद्धा वाढवायच्या आहेत, म्हणून जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार आणि प्रसार होऊ दिला जात नाही. भोंदूबाबा अशोक खरातसह बुवाबाबांचे प्रस्थ वाढविण्याचे काम फडणवीस सरकारने केले आहे, असा गंभीर आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
रुपाली चाकणकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असलेली जवळीक हे खरात याच्यावर झालेल्या कारवाईचे कारण असू शकते, असेही मानव यावेळी म्हणाले.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून ‘वृक्ष तिथे छाया, बुवा तिथे बाया’ जनजागृती अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. यानिमित्त बुलढाण्यात श्याम मानव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. तत्पूर्वी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
फडणवीस सरकारवर टीका करताना श्याम मानव म्हणाले, सध्या राज्यात भोंदू खरात प्रकरण गाजत आहे. प्रदीप मिश्रा, धीरेंद्र शास्त्री बागेश्वर याच्यासारखे मोठे बुवा, बाबांचे प्रस्थ वाढत आहे. खरातवर कारवाई झाली, ती योग्यच आहे. पण बागेश्वरसह इतरांवर कारवाई का होत नाही? असा सवालही त्यांनी केला.
काँग्रेसच्या काळातील कारवाईबद्दल बोलताना मानव म्हणाले, बुवा, बाबांवर एफआयआर दाखल करताना पोलिस स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचे. आता सरकारच्या संमतीशिवाय पानही हलत नाही. खरातसारख्या भोंदू बुवा, बाबांना प्रतिष्ठा देण्याचे काम देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातूनच सुरू असल्याचे सांगत गेल्या काही वर्षापासून जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार, प्रसार आणि अंमलबजावणी करण्यात येत नाही. अजितदादा पवार यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली होती. मात्र, फडणवीस यांनी झुलवत ठेवले. अधिकारी आणि यंत्रणांवर मोठे दडपण आहे. जादूटोणाविरुद्ध कायद्याचा प्रचार, प्रसार झाला असता तर खरातसारखा बाबा उदयास आलाच नसता, असेही ते म्हणाले.
चाकणकरही आरोपीच!
खरात प्रकरणात आरोपीला सहाय्य करणे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे रूपाली चाकणकरदेखील आरोपी आहेत, असेही मानव म्हणाले.
मुख्यमंत्री होण्यासाठी खरातकडे पूजा
सत्ताधाऱ्यांपैकी एका मोठ्या नेत्याने मुख्यमंत्री होण्यासाठी भोंदू अशोक खरातकडे पूजा केल्याचे पोलिस अधिकारी सांगतात, असे श्याम मानव यांनी यावेळी सांगितले.


