The District Collector’s sensitivity : जिल्हाधिकाऱ्यांची संवेदनशीलता: आठ बालकांच्या पुनर्वसनासाठी विशेष पुढाकार आणि एका चिमुकल्याचे स्वप्न साकार

प्रतिनिधी : बुलढाणा येथील बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि हक्काचे कौटुंबिक वातावरण मिळवून देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी अत्यंत संवेदनशील भूमिका घेत एका कौतुकास्पद उपक्रमाची अंमलबजावणी केली आहे. त्यांच्या विशेष पुढाकारामुळे जिल्ह्यातील दत्तकविधान प्रक्रियेतील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली प्रकरणे मार्गी लागली असून, आठ बालकांच्या सुरक्षित आणि प्रेमळ कुटुंबात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दत्तकविधान ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून कोणत्याही बालकाला माया, आपुलकी, सुरक्षितता आणि शिक्षणाचा आधार मिळवून देण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. प्रत्येक बालकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, या विचारातून जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी या संपूर्ण प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी संबंधित यंत्रणांना तातडीने आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या या मार्गदर्शनाखाली यंत्रणेने वेगाने काम करत एकूण आठ प्रकरणांमधील सर्व कायदेशीर पूर्तता केली. यामध्ये संस्थांतर्गत दोन, सावत्र दत्तकविधानाची दोन आणि नातेवाईकांमार्फत दत्तकविधानाच्या चार प्रकरणांचा समावेश असून, संबंधित पालकांशी प्रत्यक्ष संवाद साधून मुलाखती घेण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेमुळे आठ बालकांना हक्काचे पालक आणि हसतेखेळते घर मिळण्याची खात्री निर्माण झाली आहे.

या संपूर्ण मोहिमेदरम्यान घडलेला एक प्रसंग अत्यंत भावनिक आणि उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून जाणारा ठरला. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे हे पालकांसोबत संवाद साधत असताना त्यांनी एका चिमुकल्या बालकाला अत्यंत आपलेपणाने विचारले की, तुला मोठे झाल्यावर काय व्हायचे आहे? त्यावर त्या निरागस बालकाने क्षणाचाही विलंब न लावता अत्यंत आत्मविश्वासाने उत्तर दिले की, मला मोठे होऊन कलेक्टर व्हायचे आहे.
एका छोट्या बालकाच्या तोंडून आलेले हे उच्च महत्त्वाकांक्षेचे उत्तर ऐकून जिल्हाधिकारी भारवून गेले. त्यांनी त्या बालकाच्या डोळ्यांमधील जिद्द आणि उत्साह ओळखत त्याला अतिशय प्रेमाने थेट आपल्या जिल्हाधिकारी पदाच्या खुर्चीवर बसवले. एवढेच नव्हे तर, तुझ्या भविष्यातील सर्व इच्छा पूर्ण होवोत, असे म्हणत त्याला उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक आशीर्वाद दिले. तसेच तुझे स्वप्न नेहमी मोठे ठेव आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न कर, असा मोलाचा सल्ला दिला. एका बालकाच्या छोट्याशा स्वप्नाला मिळालेले हे प्रशासकीय बळ उपस्थितांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले.
या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे, संरक्षण अधिकारी सागर राऊत आणि दत्तकविधान संस्थेचे संस्थापक गजानन कुलकर्णी यांनी उत्तम समन्वय साधत ही मोहीम फत्ते केली. या सकारात्मक पावलामुळे बुलढाणा जिल्ह्यातील आठ बालकांच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण झाली असून, त्यांना एका उज्ज्वल भविष्याची भेट मिळाली आहे.


