Three villages face water shortage : तीन गावांना पाणीटंचाईच्या झळा.

बुलडाणा दि. 6 : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता बुलढाणा तालुक्यातील तिन गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये पिंपरखेड, वरवंड व सैलानी या ठिकाणी ठरवून दिल्याप्रमाणे टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी दिली.
सैलानी गावाला १५० पशुधन व १००८ लोकसंख्येसाठी एक टॅंकर २४ हजार ६६० लिटर्स पाणी, पिंपरखेड गावाला ८०० पशुधन व ६८० लोकसंख्येसाठी एक टॅंकर १३ हजार ६०० लिटर्स पाणी व वरवंड गावाला ९५० पशुधन व ३९७५ लोकसंख्येसाठी एक टॅंकर ४० हजार लिटर्स पाणी दररोज टँकरव्दारे पुरवठा करेल.
पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या पाच गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी बुलढाणा यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.


