Two Accused Who Attacked Police Behind Bars : पोलिसांवर हल्ला करणारे दोन आरोपी गजाआड

हॉटेल विसावावर जेवत असतानाच पकडले : मेहकर व बीबी पोलिसांची संयुक्त कारवाई
मेहकर : शहरातील लक्ष्मीनारायणनगरमध्ये पोलिसांवर हल्ला करून दुचाकीवरून पसार झालेल्या सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीतील दोन मुख्य आरोपींना बीबी पोलिसांना नाट्यमयरीत्या पकडले. २२ मेच्या रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास बीबी येथील हॉटेल विसावा येथून पोलिसांनी फिल्मी स्टाइल आरोपींना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मेहकर येथील दरोड्यातील संशयित आरोपी बीबी येथील हॉटेल विसावा येथे जेवण करत होते. ही माहिती मिळताच बीबी पोलीस स्टेशनचे एपीआय चंद्रकांत पाटील यांनी तातडीने सूत्रे हलवली. कोणताही संशय येऊ नये म्हणून एपीआय पाटील, पीएसआय शिंदे, हेड कॉन्स्टेबल रविराज चव्हाण आणि पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र बोरे हे सर्वजण शासकीय गाडी सोडून खासगी वाहनाने तातडीने हॉटेल विसावा येथे पोहोचले. अत्यंत चपळाईने आणि फिल्मी अंदाजामध्ये दोन्ही आरोपींवर झडप घालून त्यांना पकडण्यात आले. यावेळी मेहकर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व ठाणेदार व्यंकटेश आलेवार हेसुद्धा हजर झाले. पोलिसांची ही अचानक आणि थरारक कारवाई पाहून हॉटेल परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
गुन्ह्याची कबुली; आरोपी मेहकर पोलिसांच्या ताब्यात
पकडण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना तातडीने बीबी पोलीस स्टेशन येथे आणून दरोड्याच्या गुन्ह्याबाबत कसून विचारपूस करण्यात आली. पोलिसांच्या कडक चौकशीसमोर दरोडेखोरांनी अखेर केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.
पुढील कायदेशीर कारवाईसाठी बीबी पोलिसांनी या दोन्ही आरोपींना मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आलेवार आणि त्यांच्या टीमच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या दरोडेखोरांना अवघ्या काही तासांत जेरबंद केल्यामुळे बीबी आणि मेहकर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.


