mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

डोरवीच्या भागवत ची गरुडझेप : Dorvi’s Bhagwat Takes a Giant Leap

शेअर करा :

Dorvi’s Bhagwat Takes a Giant Leap : पंखांची गरज नाही, जिद्दच देते भरारी: ‘डोरवीच्या भागवत’ची गरुडझेप 

Dorvi's Bhagwat Takes a Giant Leap

 


अमोल साळवे 

मलकापूर पांग्रा प्रतिनिधी : यशस्वी होण्यासाठी केवळ पंख असून उपयोग नाही, तर खरी गरज असते ती अदम्य जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाची. आयुष्यात कितीही संकटे आली, अडचणींचा डोंगर उभा राहिला तरी, मेहनतीच्या बळावर तो भेदून पुढे जाता येते. या जगात काहीही अशक्य नाही, फक्त सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते. मलकापूर पांग्रा येथील डोरवी गावातल्या एका गरीब शेतकरी कुटुंबातील भागवतने हेच सिद्ध करून दाखवले आहे. त्याची ही यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

 

भागवतचे वडील ज्ञानेश्वर सोळंके हे अल्पभूधारक शेतकरी. अवघ्या वीस गुंठे शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण असल्याने त्यांनी शहरात जाऊन मजुरी केली. आपल्या मुलाच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांनी अथक कष्ट उपसले. भागवतनेही वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून, ते शहरात असताना गावात बहिणीकडे राहून आपले शिक्षण पूर्ण केले. एक दिवस आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करायचेच, हा ‘संकल्प’ त्याने आपल्या मनात पक्का केला होता.

 

या संकल्पाच्या पूर्ततेसाठी भागवतने मलकापूर पांग्रा येथील ‘संकल्प क्लासेस’मध्ये पोलीस भरतीची तयारी सुरू केली. अनेक रात्री जागून, दिवसा कष्ट करून त्याने आपल्या ध्येयाचा पाठलाग केला. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आले. एकाच वेळी बुलढाणा चालक पोलीस, नागपूर कारागृह आणि राज्य राखीव पोलीस दल या तिन्ही ठिकाणी अंतिम निवड यादीत त्याने आपले स्थान मिळवले. ही केवळ त्याची निवड नव्हती, तर त्याच्या जिद्दीचा, चिकाटीचा आणि परिश्रमाचा विजय होता.

 

‘अडचण आहे, परिस्थिती नाही’ असे सांगत स्वतःच्या अपयशाचे भाबडे समर्थन करणाऱ्या अनेकांसाठी भागवतची ही ‘सक्सेस स्टोरी’ एक प्रेरणास्रोत आहे. जे आपल्या स्वप्नांमध्ये जगतात, तेच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात. ‘पंखांचा काही उपयोग नाही, धैर्यच माणसाला भरारी घ्यायला लावते’ या ओळी भागवतने आपल्या जीवनातून सार्थ करून दाखवल्या आहेत.

आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/

भागवतच्या या दैदीप्यमान यशाबद्दल गावकऱ्यांनी त्याचा सन्मान केला. या प्रसंगी कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते, तर भागवतच्या डोळ्यात आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केल्याचे समाधान स्पष्ट दिसत होते. आपल्या यशाचे श्रेय त्याने आई-वडील, ताई आणि दाजी गजानन शेळके, प्रा. प्रदीप दानवे आणि शिक्षक वृंद यांना दिले. अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करून, हार न मानता मेहनतीच्या बळावर यश मिळवणाऱ्या भागवतवर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याची ही कथा केवळ एका व्यक्तीची नाही, तर जिद्द आणि चिकाटीच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते याचा तो एक जिवंत दाखला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top