A pig ambushed a laborer, killing him after his auto overturned : मोकाट डुक्कर आडवे आल्याने ऑटो उलटून एक मजूर दगावला, तर काही जण जखमी झाले.

रंगपंचमीला पोटाची खळगी भरण्यासाठी निघालेल्या मजुराचा अपघाती मृत्यू; काहीजण जखमी
पातूर : हातावर जीवन जगणाऱ्या मजूर, कामगारांना ना कुठला उत्सव, ना आनंद. बस्स! त्यांच्या कुटुंबियांना दोन वेळची भाकरी मिळविण्यासाठीची चिंता असते. भाकरीच्या चंद्रामागे धावत असताना एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोकाट डुक्कर आडवे आल्याने ऑटो उलटून मजूर दगावला, तर काही जण जखमी झाले.
पातूर तालुक्यातील अतिदुर्गम भागाच्या गावंडगाव-पांगरताटी परिसरात ३ मार्च रोजीच्या पहाटे डुक्कर आडवे आल्याने हा अपघात घडला. पांगरताटी येथील मजूर रोजंदारीसाठी बाहेरगावी जात होते. गावंडगाव येथील पुलाजवळ ऑटोसमोर अचानक डुक्कर आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. वाहन घसरून रस्त्याच्या कडेला उलटले. या भीषण अपघातात काही प्रवासी रस्त्यावर फेकले गेले. अपघाताचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. यापैकी राजू दामू जाधव (रा. पांगरताटी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, मोकाट जनावरांच्या वाढत्या त्रासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनामा करून पुढील तपासाला सुरुवात केली.


