mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

कधी संपणार वनवास आई-वडिलांचा : When will the parents’ exile end

शेअर करा :

When will the parents’ exile end : कधी संपणार वनवास आई-वडिलांचा आजही कित्येक पालक उपेक्षितच!

When will the parents' exile end


 बुलढाणा  : फादर्स डेच्या उत्साहात न्हाऊन निघत असताना, समाज माध्यमांवर पितृप्रेमाचे गोडवे गायले जात असताना, एक कटू सत्य आपल्या डोळ्यासमोर उभे राहते: आजही अनेक माता-पिता आपल्याच मुलांकडून उपेक्षित आहेत, त्यांच्या नशिबी वनवासच आहे. ही केवळ एक भावनिक साद नाही, तर आपल्या समाजाच्या बदलत्या मूल्यांवर आणि वाढत्या स्वार्थावर प्रकाश टाकणारी एक गंभीर समस्या आहे.

आज एकीकडे शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे, तर दुसरीकडे श्रीमंत पालकांसमोरही त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला दिसतो. अनेक वृद्ध आई-वडील आपल्या पाल्यांकडून आपले पालनपोषण व्हावे यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावत आहेत. ही परिस्थिती केवळ हृदयद्रावक नाही, तर आपल्या संस्कृतीला आणि नैतिकतेला आव्हान देणारी आहे. मेहकर उपविभागीय महसूल अधिकारी रवींद्र जोगी यांच्यासारखे अधिकारी या संकटात सापडलेल्या पालकांसाठी आशेचा किरण बनले आहेत. त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय देऊन आपल्या वृद्ध आई-वडिलांचे पालनपोषण न करणाऱ्या पाल्यांना अद्दल घडवली आहे. काही प्रकरणांमध्ये त्यांना संपत्तीमध्ये सहधारक बनवले, तर काही प्रकरणांमध्ये आई-वडिलांना पोटगी देण्याचे आदेश दिले. हे निर्णय एका बाजूला दिलासा देणारे असले तरी, दुसऱ्या बाजूला हेच दर्शवतात की, ज्या पालकांनी आपल्या मुलांना घडवण्यासाठी आयुष्य वेचले, तेच आज उपेक्षित आहेत.

मागील काही वर्षांपासून पालक आपल्या पाल्याला उच्च शिक्षण मिळावे, तो कुठेही कमी पडू नये यासाठी त्याला वसतिगृहात किंवा इतर ठिकाणी शिक्षणासाठी पाठवतात. जेव्हा त्या पाल्याला आई-वडिलांचे कष्ट, त्यांच्या हालअपेष्टा समजण्याची वेळ येते, तेव्हा तो घरी नसतो. त्याला आई-वडिलांनी कोणते कष्ट केले, हे माहीतच नसते. दुसरीकडे, आजकाल लग्नासाठी वधू मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत मिळालेली वधू ज्याप्रमाणे मुलाला नाचवेल, त्याचप्रमाणे मुलगा वागतो. मग घरात आई-वडील नकोसे होतात. यातून अनेक मुले आई-वडिलांना सोडून वेगळे राहायला जातात आणि त्यांना विसरून जातात. यात विशेष म्हणजे, जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये आई-वडिलांची जी संपत्ती होती, तीच पाल्यांनी आपल्या नावावर करून घेतली आणि नंतर पालकांना वाऱ्यावर सोडून दिले. ही केवळ कृतघ्नता नाही, तर माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे.

मेहकर उपविभागीय महसूल अधिकारी रवींद्र जोगी यांनी मागील दीड वर्षांत त्यांच्याकडे आलेल्या अनेक पालकांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांनी काही प्रकरणांमध्ये मुलांशी सामंजस्य घडवून आणले, त्यांना आई-वडिलांची किंमत, त्यांचे कष्ट आणि त्यांची संपत्ती परत करण्याबद्दल समजावून सांगितले. यामुळे काही मुलांना पालकांचे संगोपन करण्यास प्रवृत्त केले. तर काही प्रकरणांमध्ये, आई-वडील व ज्येष्ठ नागरिक संगोपन व कल्याण कायदा 2007 नुसार कार्यवाही करत त्या वृद्ध पालकांना न्याय मिळवून दिला. यामध्ये दोन प्रकरणांमध्ये वृद्ध आई-वडिलांना सहधारक बनवले, म्हणजेच जी संपत्ती आहे, त्या संपत्तीमध्ये त्या पालकांची नोंद केली, ज्यामुळे नाईलाजाने त्या मुलांना आपल्या वृद्ध आई-वडिलांचे संगोपन करावे लागणार. तर दहा प्रकरणांमध्ये पोटगी मंजूर केली. यासोबतच सात प्रकरणे सुरू असून, त्यांचाही लवकरच निकाल लागणार आहे. अशा प्रकरणांना पाहता, आजही अनेक आई-वडील उपेक्षित असून, त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे. यासाठी समाजात जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे.

एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेत, मेहकर तालुक्यातील एक वृद्ध जोडपे उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयात आले. त्यांनी आपली हकीकत सांगितली की, त्यांचे पालनपोषण न करणारा मुलगा गृह खात्यात कार्यरत होता. महसूल विभागाने त्याला नोटीस काढली असता, त्याने त्याचे उत्तरही दिले नाही आणि सुनावणीसाठी हजरही राहिला नाही. शेवटी, उपविभागीय महसूल अधिकारी रवींद्र जोगी यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून त्यांचा कर्मचारी सुनावणीसाठी हजर होत नसल्याचे सांगितले. त्याला हजर करण्यासंबंधी पत्रात लिहिले गेले, तेव्हा पोलीस अधीक्षकांनी ताकीद देऊन त्या पोलीस कर्मचाऱ्याला सुनावणीसाठी हजर राहावे लागले. या प्रकरणी त्या पोलीस कर्मचाऱ्याला दरमहा दहा हजार रुपयांची पोटगी आपल्या वृद्ध आई-वडिलांना द्यावी असे आदेश काढण्यात आले. यावरून हेच दिसून येते की, आजही पालक उपेक्षित आहेत. ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे पालनपोषण करण्यासाठी जिवाचे रान केले, आज त्याच पालकांना पालनपोषणासाठी दारोदार भटकावे लागते.

फादर्स डे साजरा करत असताना, आपण या कटू सत्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आपल्या समाजातील या वनवासात सापडलेल्या माता-पित्यांना न्याय मिळवून देणे, त्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. केवळ कायद्याने नव्हे, तर माणुसकीच्या नात्याने, नैतिकतेच्या आधारावर या समस्येवर तोडगा काढणे आवश्यक आहे. कारण, आई-वडिलांचा वनवास संपल्याशिवाय, खऱ्या अर्थाने कोणताही सण साजरा करणे व्यर्थ आहे.

When will the parents' exile end

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top