mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

भीषण अपघातात १० महिला मजूर गंभीर : 10 female laborers critical in accident

शेअर करा :

10 female laborers critical in accident : वाशीम-अकोला महामार्गावरील मेडशी बायपासजवळ गुरुवार, ३० एप्रिल रोजी सकाळी अपघातात दहा मजूर महिला गंभीर जखमी झाल्या.


10 female laborers critical in accident
क्षतिग्रस्त झाकलेले वाहन
10 female laborers critical in accident
मेडशी बायपासजवळ कार मॅक्सिमोवर धडकली

मेडशी : वाशीम-अकोला महामार्गावरील मेडशी बायपासजवळ गुरुवार, ३० एप्रिल रोजी सकाळी रक्ताचा थरार घडला. भरधाव आलिशान कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली. या हृदयद्रावक अपघातात हळद काढणीच्या कामासाठी जाणाऱ्या १० महिला मजूर गंभीर जखमी झाल्या. ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेडशी येथील काही महिला मजूर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नेहमीप्रमाणे मजुरीच्या कामाला निघाल्या होत्या. रिधोरा येथे हळद काढणीचे काम असल्यामुळे त्या एमएच – ०८ – एजी – ०९६७ क्रमांकाच्या ‘मॅक्झिमो’ वाहनात बसून इतर सहकाऱ्यांची वाट पाहत होत्या. हे वाहन रस्त्याच्या कडेला उभे असतानाच, वाशिमकडून अकोल्याच्या दिशेने अत्यंत वेगाने जाणाऱ्या टाटा हॅरियर कारने (क्रमांक जीजे-१९-बीजे-२०००) या उभ्या असलेल्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली.

अपघाताची धडक इतकी जबरदस्त होती की, धडकेनंतर टाटा हॅरियर कार महामार्गावरच उलटली. तर उभ्या असलेल्या मॅक्झिमो वाहनाचाही मोठ्या प्रमाणावर चक्काचूर झाला आहे. वाहनात बसलेल्या महिलांना काही कळण्याच्या आतच हा भीषण अपघात घडल्याने घटनास्थळी एकच टाहो फोडण्यात आला. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी आणि हॉटेल व्यावसायिकांनी मदतीसाठी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच मेडशी येथील तरुणांनी आणि पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन जखमींना वाहनातून बाहेर काढले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या १० महिलांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे वाशिम आणि अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

वाशिम-अकोला महामार्गावर वाहनांच्या वाढत्या वेगामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः बायपास परिसरात अनेक चालक नियमांचे उल्लंघन करून वाहने चालवत असल्याने सर्वसामान्य मजुरांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. हातावर पोट असणाऱ्या या महिला मजूर सकाळीच कामासाठी घराबाहेर पडल्या होत्या, मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून, कार चालकावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top