The body of the young man who was taken with him as a cleaner was brought back : नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात पिंपरी सरहद्द येथील २३ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना ४ मार्च रोजी मध्यरात्री पवनी परिसरात घडली.



भरधाव पिकअपची उभ्या ट्रकला धडक : वाशीम जिल्ह्यातील पिंपरी सरहद्द येथील युवकाचा जागीच मृत्यू
रामटेक/मेहकर
नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात पिंपरी सरहद्द येथील २३ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना ४ मार्च रोजी मध्यरात्री पवनी परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-२८-बीबी-९८५२ क्रमांकाची बोलेरो पिकअप नागपूर–जबलपूर महामार्गावरून जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एपी-३९-टीझेड-०१४४ क्रमांकाच्या ट्रकला जोरदार धडकली. धडक इतकी जबरदस्त होती की पिकअपच्या केबिनचा चुराडा झाला.
या अपघातात पिकअपमध्ये क्लिनर म्हणून साइडला बसलेला सोहेल खान राजदार खान (वय २३, रा. पिंपरी सरहद्द) याचा जागीच मृत्यू झाला. तर वाहन चालक फेरोज पठाणला किरकोळ दुखापत झाली.
घटनेची नोंद देवलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आली असून मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले.
दरम्यान, मृत सोहेल खानवर बुधवारी उशिरा रात्री पिंपरी सरहद्द येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.
झोपेतच आला काळ
सोहेल खान हा डोणगाव येथील पाण्याच्या फिल्टर प्लांटवर काम करीत होता. त्यामुळे तो नेहमीच डोणगावला राहायचा. मात्र ३ मार्च रोजी तो घरी असल्याने चालक फिरोज पठाण याने त्याला सांगितले की, चल ट्रीप मारके आयेंगे. सोहेल सोबत गेला. मात्र अपघाताच्या वेळी केबिनमध्ये झोपलेल्या सोहेलवर काळाने घाला घातला. घरून गाडीत बसून गेलेल्या सोहेलचा मृतदेहच घरी आणण्यात आला.
मनमिळाऊ सोहेलच्या मृत्यूने हळहळ
सोहेल खान घरातील मोठा व कमावता सदस्य होता. त्याच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. त्याचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ असल्याने गावात शोककळा पसरली आहे.


