The journey from childhood struggles to PSI : मातीच्या खोलीतून सुरू झालेली कहाणी आज PSI पदावर आई-वडिलांच्या पाठबळाने आणि जिद्दीने प्रशांत ठोंबरे झाले यशस्वी.

बुलढाणा : दुधा येथील जिजामाता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात हजारो विद्यार्थ्यांना घडवणारे आदर्श शिक्षक श्री. आत्माराम तुकाराम ठोंबरे यांचे चिरंजीव प्रशांत आत्माराम ठोंबरे यांनी २०२६ मध्ये पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदावर यशस्वी निवड मिळवली आहे.
मूळचे तेल्हारा गावचे रहिवासी असलेले श्री. आत्माराम ठोंबरे १९९३ मध्ये दुधा येथे शिक्षक म्हणून निवड झाल्यानंतर तेथेच स्थायिक झाले. सुरुवातीला जवंजाळ बाबांच्या छोट्याशा १०×१० फूट मातीच्या खोलीत राहून जीवन सुरू केले. ७ फेब्रुवारी १९९४ रोजी जन्मलेला प्रशांत हा मेहनती आणि जिद्दी मुलगा होता. इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण जिजामाता हायस्कूल, दुधा येथे पूर्ण केल्यानंतर पॉलिटेक्निक आणि नंतर इंजिनिअरिंगचा प्रयत्न केला, पण त्यात रुची नसल्याने त्याने आपले खरे स्वप्न – पोलिस अधिकारी होण्याचा मार्ग निवडला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन पुण्यात जाऊन तयारी सुरू केली. मात्र, कोरोना महामारीने सगळे काही थांबवले. वाढते वय, समाजातील टीका, आर्थिक अडचणी – अशा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. पण आई-वडिलांचा अतूट पाठिंबा, मित्रांचा आशीर्वाद आणि स्वतःची ज्वलंत जिद्द यामुळे तो कधीही हारला नाही.
यशाने दोनदा जवळून हुलकावणी दिली, पण २०२६ मध्ये त्याच्या अथक मेहनतीचे फळ मिळाले आणि त्यांची महाराष्ट्र पोलिस दलात PSI म्हणून निवड झाली .
श्री. आत्माराम ठोंबरे हे फक्त आदर्श शिक्षकच नाहीत, तर आदर्श वडीलही आहेत. त्यांनी मोठा मुलगा प्रशांतला PSI बनवले, तर दुसरा मुलगा डॉ. श्रीकांत आत्माराम ठोंबरे एम.डी. मेडिसिन आणि लहान मुलगा डॉ. अभिषेक आत्माराम ठोंबरे हे दोघेही वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी झाले आहेत.
एक शिक्षक, एक वडील आणि एक कुटुंब यांनी दाखवलेल्या मेहनत, जिद्द आणि पाठबळाचे हे उत्तम उदाहरण आहे.


