Senior snake charmer dies of snake bite : पकडत असताना विषारी सापाने चावा घेतल्याने मलकापूर येथील एका ज्येष्ठ सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू झाला. १३ मार्चला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

मलकापूर : पकडत असताना विषारी सापाने चावा घेतल्याने मलकापूर येथील एका ज्येष्ठ सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू झाला. १३ मार्चला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. तीन दिवसांपूर्वीच खामगाव तालुक्यातही एका सर्पमित्राचा सापाने दंश केल्याने मृत्यू झाला.
नामदेव विश्वनाथ उज्जैनकार (रा. यशोधाम कॉलनी, मलकापूर) असे मृत सर्पमित्राचे नाव आहे. गाडेगाव परिसरातील पवनसुत नगरातील काही नागरिकांनी रात्रीच्या सुमारास सर्प निघाल्याची माहिती सर्पमित्र नामदेव उज्जैनकार यांना दिली. तातडीने दाखल होऊन दोन फूट खोल नालीमध्ये दडून बसलेल्या सापाला त्यांनी पकडले. मात्र साप झटका देऊन चिमट्यातून सटकला आणि उज्जैनकार यांच्या उजव्या पायाच्या पंजावर दंश केला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, काही वेळानंतर सर्पमित्र उज्जैनकर यांनी जगाचा निरोप घेतला. आतापर्यंत अनेक सापांना त्यांनी जीवदान दिले. तर अनेक नागरिकांचा विषारी सापांना पकडून जीव वाचविला. त्यांच्या मृत्यूने मलकापूर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.


