वेतन त्रुटी, जुनी पेन्शनसंदर्भात लवकरच ग्रामविकास मंत्र्यांसोबत बैठक : Meeting with Rural Development Minister soon to discuss salary error, old pension
राज्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड यांची माहिती
बुलढाणा : वेतन त्रुटी, जुनी पेन्शन आणि कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात शासन दरबारी युनियनच्या वतीने पाठपुरावा केला जात आहे. आपल्या विविध प्रश्नांसंदर्भात लवकरच ग्रामविकास मंत्र्यांसोबत बैठक आयोजित केली जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाबुराव पुजरवाड यांनी नुकत्याच झालेल्या सभेत दिली.
जिल्हा परिषदेच्या श्री शिवाजी सभागृहात प्रदेशाध्यक्ष बाबुराव पुजरवाड यांच्या उपस्थितीत विशेष सभा उत्साहात पार पडली. विशेष म्हणजे पुजरवाड सपत्नीक उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला महिला कर्मचारी ब्रिगेडच्या वतीने त्यांच्या पत्नीचे साडी-चोळी देऊन आदर, सत्काराने स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी मंचावर जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेश वाईन्देशकर, राज्य उपाध्यक्ष विजय तांदूळकर आणि जिल्हा परिषद कर्मचारी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा पुष्पाताई गायकवाड, युनियनचे उपाध्यक्ष राहुल कासारे, सचिव अनिल सुसर, अनिरुद्ध देशपांडे, जिल्हा सरचिटणीस प्रदीप सपकाळ आणि इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सभेत पुजरवाड यांनी उपस्थित कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या भविष्यातील वाटचालीबद्दल व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सखोल मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन विजय तांदूळकर यांनी केले, तर राहुल कासारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सभेला जिल्ह्यातील जिल्हा परिषद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला जिल्हाध्यक्षपदी अरुणा पांचाळ
यावेळी अरुणा पांचाळ यांची जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या महिला जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.


