Two laborers killed in accident. : अपघातात दोन मजुरांचा मृत्यू तीनजण गंभीर जखमी : ट्रकची थ्रेशर ट्रॅक्टरला धडक : मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर : पिकाची मळणी करण्यासाठी ट्रॅक्टरला जोडलेले थ्रेशर घेऊन जाणाऱ्या मजुरांच्या ट्रॅक्टरला भरधाव वेगातील ट्रकने धडक दिली. या अपघातात थ्रेशरवरील दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. मलकापूर ते मुक्ताईनगर मार्गावर तालसवाडा-दसरखेड शिवारात ३० एप्रिलच्या पहाटे चार वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
मलकापूर तालुक्यातील धरणगावचे मजूर हेडंबा थ्रेशर ट्रॅक्टर (क्रमांक एमएच-२८-एझेड-३२५९) घेऊन मजूर पहाटेच्या सुमारास शेताकडे जात होते. तालसवाडा-दसरखेडदरम्यान हॉटेल महाराजा रेस्टॉरंटसमोर आरजे-२९-जीबी-५६७६ क्रमांकाच्या ट्रकने ट्रॅक्टरला मागून धडकला. या अपघातात बाळकृष्ण त्र्यंबक पाचपोर (वय ५०, रा. धरणगाव) आणि रोहन किसन पाटील (वय २६) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर राजू नेरकर (वय ५०), मंगेश विकास पाटील (वय ३०) आणि आकाश रामचंद्र सोनटक्के (वय २८) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे यांच्यासह एएसआय विजय टेकाडे, गजानन बावस्कर, राजू साठे, बंटी कोलते, संदेश शिंदे, नीलेश बोंडे आणि अश्विन साठे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याने धरणगाववर शोककळा पसरली आहे.


