Thar tried to kill four people : जुना वाद मनात ठेवून खुनशी वृत्तीच्या एकाने थार जीप अंगावर घालून चार जणांना जीवाने ठार मारण्याचा प्रयत्न केला.

तीन जणांची प्रकृती गंभीर : नांदुरा तालुक्यातील कोकलवाडी येथील घटना
नांदुरा : जुना वाद मनात ठेवून खुनशी वृत्तीच्या एकाने थार जीप अंगावर घालून चार जणांना जीवाने ठार मारण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील कोकलवाडी येथे २८ एप्रिलच्या सकाळी दहाच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रामेश्वर दादाराव भगत असे क्रूर जीप चालकाचे नाव आहे. मलकापूर तालुक्यातील वरखेड येथील रहिवासी इंद्रसिंह रामलालसिंह राजपूत (वय ४९) यांचा शेती व गिट्टी खदानचा व्यवसाय आहे. नांदुरा तालुक्यातील कोकवाडीचा रहिवासी आरोपी रामेश्वर भगत व त्यांच्यात जुना वाद आहे. इंद्रसिंह राजपूत हे नातेवाइकाकडे कोकलवाडी येथे तेरवीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. हनुमान मंदिरासमोर आल्यानंतर नातेवाइक अनिलसिंह पंचमसिंह राजपूत, प्रतापसिंह अरुणसिंह राजपूत, आतिषसिंह परमेश्वरसिंह राजपूत, रामसिंह मोहनसिंह राजपूत यांच्याशी बोलत थांबले होते. सकाळी दहा वाजेच्या सुमारास आरोपी रामेश्वर भगतने एमएच-५६-ए-८१११ क्रमांकाच्या महिंद्रा थार गाडीने इंद्रसिंह यांच्यासह नातेवाइकांना उडविले. या धडकेने सर्वजण जोरात बाजूला फेकल्या गेले. इंद्रसिंह राजपूत हे हातपंपाच्या बाजूने पडले. यानंतर पुन्हा आरोपीने त्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. परंतु मध्ये हातपंप असल्याने त्यांचा जीव वाचला. नंतर आरोपीने पलायन केले.
या घटनेत इंद्रसिंग राजपूत याच्या कमरेला तसेच उजव्या हाताला व डोक्याला मुका मार लागला. तर रामसिंग राजपूत, आतिष राजपूत व प्रतापसिंह राजपूत हे गंभीर जखमी झाले. रुग्णवाहिकेने त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
इंद्रसिंह राजपूत यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी आरोपी रामेश्वर भगत यांच्याविरुद्ध जीवाने मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय पवार करीत आहेत.


