mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

सात घरे जळाली; वढवच्या शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर : The world of the farmers of Wadhav is in the open

शेअर करा :

The world of the farmers of Wadhav is in the open : लोणार तालुक्यातील वढव येथील सात शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटानंतर आगीची आपत्ती कोसळली. २८ एप्रिलच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत घरे जळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.


The world of the farmers of Wadhav is in the open
आगीत जळत असलेली घरे

कोट्यवधी रुपयांची हानी; आगग्रस्तांना तत्काळ मदतीची गरज

बुलढाणा : शेतीत राब राब राबून भरघोस उत्पन्न मिळविण्याचा बळीराजा सारखा प्रयत्न करतोय. मात्र, आस्मानी संकट त्याचा पिच्छा सोडत नाही. या संकटांवर मात करीत असतानाच अनंत अडचणींना शेतकरी तोंड देत आहे. लोणार तालुक्यातील वढव येथील सात शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटानंतर आगीची आपत्ती कोसळली. २८ एप्रिलच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत घरे जळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

शेतकऱ्यांसह घरातील सदस्य वेळीच बाहेर पडल्याने प्राणहानी टळली. मात्र, घरातील डाळदाणा, धान्य, सर्व साहित्य, कपडे, महत्त्वाची कागदपत्रे असे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. आग लागल्याने गावात एकच धावपळ उडाली. गावकऱ्यांनी पाणी आणून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. तर लोणार, मेहकर आणि रिसोड येथून आलेल्या अग्निशामक दलांनी शर्थीचे प्रयत्न करीत आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत सर्वकाही जळून खाक झाले होते.

सातही शेतकऱ्यांच्या संसाराची यामध्ये राखरांगोळी झाली. सुभाष आश्रू सोसे यांचे १९ लाख २० हजारांचे नुकसान झाले. त्यांच्या घरातील सोयाबीन, हरभरा, तूर, गहू, कांद्यासह सर्वकाही जळाले. सदाशिव अंबादास सोसे यांचे १३ लाख ९५ हजार, बद्रीनाथ रामभाऊ सोसे यांचे १९ लाख ५ हजार, रमेश आश्रू सोसे यांचे ५ लाख ८५ हजार, कडूजी सखाराम सोसे यांचे २६ लाख ६५ हजार, पुष्पा महादू सोसे यांचे १८ लाख ४५ हजार व शालूबाई दिलीप सोसे यांचे २ लाख ३० हजारांचे नुकसान झाले.

आगीच्या ज्वाळांनी या शेतकऱ्यांचे आयुष्य होरपळून निघाले आहे. आता अंगावरच्या कपड्यांशिवाय त्यांच्याकडे दुसरे काहीच उरले नाही.

२९ एप्रिल रोजी सकाळी ग्राम महसूल अधिकारी दिगंबर गावंडे, पोलीस पाटील प्रशांत तनपुरे व सरपंच मीनाक्षी विजय सोनुने यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.

अश्रूंचा बांध फुटला

आपल्या डोळ्यांदेखत जळत असलेले घरी पाहून शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयातील महिला, मुलांना अश्रू अनावर झाले होते. स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना धीर दिला. शासनाच्या वतीने त्यांचे विखुरलेले संसार पुन्हा उभारण्यासाठी तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top