Two youths tragically die in a horrific accident at Mandwa junction : मांडवा फाट्यावर काळ बनून धावली दुचाकी: भीषण अपघातात दोन तरुणांचा करुण अंत

अमोल साळवे प्रतिनिधी
मलकापूर पांगरा : सिंदखेडराजा तालुक्यातील मांडवा फाट्यावरील टी-पॉइंट वळणावर दि. ३० रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला, ज्यामध्ये भरधाव दुचाकीने लोडिंग रिक्षाला जोरदार धडक दिल्याने दोन तरुणांना आपले प्राण गमवावे लागले. पुण्याहून बिबी येथे एका विवाह सोहळ्यासाठी आलेले हे दोन्ही तरुण, लग्न आटोपून आपल्या अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी गावाकडे परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रोशन नांदुरकर (वय २९) आणि शुभम वंजाळे (वय २८, रा. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती) हे दोघे एमएच २७ बीएच ६२७६ या दुचाकीवरून मलकापूर पांग्राकडून येणाऱ्या एमएच ५० ५३६४ या लोडिंग रिक्षाला धडकले. हा अपघात इतका भीषण होता की, रोशन नांदुरकर यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. शुभम वंजाळे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने मलकापूर पांग्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी रुग्णवाहिकेतून नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

या अपघाताची माहिती मिळताच बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील, रवी चव्हाण आणि दिनेश चव्हाण हे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मलकापूर पांग्रा येथील स्थानिक नागरिकांनीही धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला. या घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अंजनगाव सुर्जी गावावर शोककळा पसरली आहे.
अपघातांचे सत्र रोखण्यासाठी उपाययोजनांची मागणी
मलकापूर पांग्रा, बिबी आणि दुसरबीड टी-पॉइंट या ठिकाणी दिशादर्शक फलक आणि गतिरोधक नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे, अशी स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. या मार्गांवर वारंवार अपघात घडत असल्याने, संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन गतिरोधक आणि दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि चालकांना योग्य दिशा दाखवण्यासाठी हे फलक अत्यंत आवश्यक आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. या अपघाताने पुन्हा एकदा रस्त्यांवरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.


