The dream was burnt in the fire : शहरातील मध्यवर्ती भागातील संतोष टॉकीज चौक परिसरात ८ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत किराणासह पाच दुकाने आगीत जळून खाक झाली.

देऊळगाव राजात आग : पाच दुकाने खाक : कोटीपर्यंत नुकसान
देऊळगाव राजा : शहरातील मध्यवर्ती भागातील संतोष टॉकीज चौक परिसरात ८ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत किराणासह पाच दुकाने आगीत जळून खाक झाली. यामध्ये व्यापाऱ्यांचे सुमारे एक कोटी रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीमुळे व्यापाऱ्यांचे स्वप्न जळून खाक झाले.
आग लागल्यानंतर आग विझविण्यासाठी मोठी गर्दी जमल्याने जालना ते चिखली महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. देऊळगाव राजा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तत्काळ दाखल झाल्या. अग्निबंबावरील कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. तब्बल अडीच तासांपर्यंत आग भडकलेली होती.
उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, ठाणेदार ब्रह्म गिरी, नगराध्यक्ष माधुरी शिपने तसेच मुख्याधिकारी अरुण मोकळे यांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेमध्ये आशिष निमूदिया यांच्या किराणा दुकानातील साठ लाख रुपयांचा किराणा माल जळून खाक झाला आहे. दिलीप निमोदिया यांच्या महालक्ष्मी एजन्सीचे ४५ लाखांचे नुकसान झाले. रमेश तिडके यांचे इलेक्ट्रिकल व मशिनरीची दुकान जळून दहा लाखांची हानी झाली आहे. अशोक अग्रवाल यांचे आईस्क्रीम सेंटर मधील फ्रिजर इन्व्हर्टर सह सर्व साहित्य भस्म सात झाल्याने दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अशोक अग्रवाल यांचे सलून देखील आगीच्या भक्षस्थानी पडले. अशोक कुदळे यांचे आठ लाख आणि सुनील भुतेकर व यश पिंपळे यांच्या दुकानाचे प्रत्येकी तीन लाख रुपयांची नुकसान झाले आहे.


