3 lakh 40 thousand customers have smart TOD meters : परिमंडळात एकुण ३ लाख ४० हजार ३०० स्मार्ट टिओडी मीटर लावण्यात आले असून यात २ लाख ७४ हजार ४३२ वीज ग्राहकांचे जुने मीटर बदलवून स्मार्ट टिओडी मीटर लावण्यात आले आहे.
स्मार्ट वीजमीटर पारदर्शक आणि ग्राहकांच्या आर्थिक बचतीचे
बुलडाणा : बदलत्या तंत्रज्ञानावर आधारित असलेले महावितरणचे स्मार्ट मीटर हे वीज ग्राहकांसाठी अत्यंत फायद्याचे आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर हे पर्याय नसून नियमित वीजबिल भरणाऱ्या वीज ग्राहकांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी स्मार्ट मीटर विषय गैरसमज करून न घेता मीटर लावण्यास महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले आहे.
स्मार्ट मीटर हे अत्याधूनिक तंत्रज्ञानावर आधारित असून स्मार्ट मीटरच्या दरमहा रिडिंगमध्ये मानवी हस्तक्षेप नाही. स्वयंचलित पद्धतीने मीटरचे वाचन होते. त्यामुळे ग्राहकांना शंभर टक्के अचूक आणि वेळेवर वीज बिल मिळणे आता शक्य झाले असल्याने महावितरणच्या वीजबिलाशी संबंधित असलेल्या तक्रारी जश्या की, सरासरी वीज बिल, वेळेत रिडींग न होणे, फॉल्टी मीटर या तक्रारी हद्दपार झाल्या आहेत.
विशेष म्हणजे, स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांना दिवसा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच्या वीज वापरासाठी प्रति युनिट ‘टाइम ऑफ डे’ (ToD) सवलत दिल्या जाते, ही सवलत फक्त स्मार्ट मीटर लागलेल्या ग्राहकांनाच मिळत आहे. जुलै २०२५ पासून लागू करण्यात आलेली ८० पैसे प्रति युनिटच्या सवलतीत एप्रिल २०२६ पासून वाढ होऊन ती सवलत आता प्रति युनिट ८५ पैसे झाली आहे.त्यामुळे या सवलतीचा वीज ग्राहकांना फायदा होत असून ग्राहकांच्या मासिक बिलात मोठी बचत होत आहे.
याशिवाय, स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या दर तासाचा वीज वापर मोबाईलवर पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे स्वतःच्या वीज वापरावर नियंत्रण ठेवणे आणि त्याचे योग्य नियोजन करणे ग्राहकांना सहज शक्य झाले आहे.
परिमंडळात एकुण ३ लाख ४० हजार ३०० स्मार्ट टिओडी मीटर लावण्यात आले असून यात २ लाख ७४ हजार ४३२ वीज ग्राहकांचे जुने मीटर बदलवून स्मार्ट टिओडी मीटर लावण्यात आले आहे. यात अकोला ८५ हजार ९५६. बुलडाणा १ लाख ४१ हजार ६१२ आणि वाशिम जिल्ह्यात ४६ हजार ८६४ मीटरचा समावेश आहे. नविन वीज जोडणीसाठी ६५ हजार १०५ मीटर लावण्यात आले आहे. यात १९ हजार ३१३ अकोला जिल्हा, ३२ हजार १७१ बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील १३ हजार ६२१ मीटरचा समावेश आहे. या व्यतिरिक्त ३२९ मीटर कायम स्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या आणि पुनर्जोडणी घेतलेल्या वीज ग्राहकांना लावण्यात आले असून उच्च दाबाच्या ३९३ ग्राहकाचे मीटर बदलविण्यात आले आणि ४१ ग्राहकांना नविन वीज जोडणी देतांना स्मार्ट मीटर लावण्यात आले आहे. या व्यतिरिक्त वीज वापराच्या अचूक मापनासाठी उपकेंद्र, फिडर, रोहित्रे यांनाही स्मार्ट मीटर लावण्यात आले आहे.
स्मार्ट मीटरमुळे वीज बिल जास्त येते हा ग्राहकांचा समज पूर्णपणे चुकीचा असून हे मीटर केवळ वापरलेल्या विजेचे अचूक मोजमाप करते. या मीटरसाठी महावितरण कोणत्याही प्रकारचे शुल्क ग्राहकांकडून आकारत नाही, शिवाय हे मीटर बसवणे सर्वच ग्राहकांसाठी अनिवार्य असून ग्राहकांच्या मनात स्मार्ट टिओडी मीटर विषयी शंका असल्यास शंकेचे निरसन करण्यात येणार असल्याचेही महावितरणने स्पष्ट केले आहे.



