mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बुलढाणा जिल्ह्यासाठी ऐतिहासिक क्षण : A Historic Moment for Buldhana District

शेअर करा :

A Historic Moment for Buldhana District : बुलढाणा जिल्ह्यासाठी ऐतिहासिक क्षण: खामगाव-जालना रेल्वे मार्गासाठी भूमी अधिग्रहणाची अधिसूचना जारी

A Historic Moment for Buldhana District


बुलढाणा प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारा आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला खामगाव-जालना रेल्वे मार्ग आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी भूमी (जमीन) अधिग्रहणाची अधिसूचना राजपत्रामध्ये प्रकाशित झाली असून, ही बुलढाणा जिल्हावासियांसाठी अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी आहे. जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अथक पाठपुराव्याला अखेर यश आले असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

 

हा रेल्वे मार्ग केवळ एक वाहतूक सुविधा नसून, तो बुलढाणा जिल्ह्याच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचा आधारस्तंभ ठरणार आहे. मध्य आणि सेंट्रल रेल्वेला जोडणारा हा महत्त्वाचा दुवा ‘पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत’ मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण निधीपैकी ५०% वाटा राज्य सरकारने उचलण्याची तयारी दर्शवली असून, त्यासंदर्भात अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली आहे. यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता.

 

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला. रेल्वेमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांनी अनेक वेळा भेटीगाठी घेऊन या प्रकल्पाची गरज आणि महत्त्व पटवून दिले. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित म्हणून, आता खामगाव-जालना रेल्वे मार्गासाठी भूमी अधिग्रहण करण्याच्या हेतूने अधिसूचना राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाली आहे.

 

रेल्वे (सुधारणा) अधिनियम २००८ च्या कलम ३७A अन्वये S.O. 2647(E) नुसार, रेल्वे अधिनियम, १९८९ (१९८९ चा २४) च्या कलम २ च्या खंड (३७A) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, केंद्र सरकारने “जालना-खामगाव दरम्यान नवीन बीजी (BG) मार्ग प्रकल्प (१६२ किमी)” यास, मध्य रेल्वे अंतर्गत “विशेष रेल्वे प्रकल्प” म्हणून अधिसूचित केले आहे. ही अधिसूचना महाराष्ट्रातील जालना आणि खामगाव जिल्ह्यांमध्ये जमिनीचे संपादन करण्यासाठी आणि सार्वजनिक उद्देशाकरिता राष्ट्रीय पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी असून, ती राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न

इंग्रज काळापासून प्रलंबित असलेला खामगाव-जालना रेल्वे मार्ग व्हावा, ही बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांची मागणी होती. लोकसभेच्या अनेक निवडणुकांमध्ये हा मुद्दा प्रचाराचा केंद्रबिंदू ठरला होता. २००९ मध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून प्रथमच निवडून आल्यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांनी या प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू केले. लोकसभेत वेळोवेळी प्रश्न उपस्थित करून त्यांनी हा प्रश्न लावून धरला, ज्यामुळे या रेल्वेच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली. त्यानंतर हा रेल्वे मार्ग ‘पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत’ तयार करण्यासंदर्भात केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली.

 

यापुढील टप्प्यात, हा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे पाठवण्यात आला. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करून, या रेल्वे मार्गासाठी ५०% निधीची तरतूद करून यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. केंद्र सरकारचा ५०% हिस्सा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सातत्याने भेटी घेतल्या आणि या रेल्वे मार्गासंदर्भात पाठपुरावा करत राहिले. या संदर्भातील प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता.

 

अखेर, खामगाव-जालना या रेल्वे मार्गासाठी भूमी अधिग्रहणाची अधिसूचना राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाली आहे. ही बुलढाणा जिल्ह्यासाठी खऱ्या अर्थाने आनंदाची बातमी आहे. २०१४ मध्ये खामगाव येथे झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचे अभिवचन जिल्हावासियांना दिले होते. त्यांच्या या आश्वासनाची पूर्तता होत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे बुलढाण्याचे खासदार तथा केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आभार मानले आहेत. हा प्रकल्प बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाला गती देईल आणि या भागातील जनतेच्या दीर्घकाळापासूनच्या स्वप्नाची पूर्तता करेल अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top