Restore Deulghat s water supply within two days.: देऊळघाटचा पाणीपुरवठा दोन दिवसांत सुरळीत करा : आमदार संजय गायकवाड

बुलढाणा : देऊळघाट येथे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या गंभीर समस्येची दखल घेत आमदार संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. ३ जून) महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. गावातील नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणीप्रश्नावर तत्काळ उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करा, असे आदेश आमदार गायकवाड यांनी दिले.
बैठकीत देऊळघाट येथील सध्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. गावातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब ग्रामस्थांनी आमदार गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर तातडीने उपाययोजना करत पुढील दोन दिवसांच्या आत गावातील पाणीपुरवठा नियमित व सुरळीत झाला पाहिजे, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
यावेळी आमदार गायकवाड यांनी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या आणि काही कारणास्तव रखडलेल्या कामांचाही आढावा घेतला. नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना संबंधित कंत्राटदाराला देण्यात आल्या. कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा अथवा विलंब खपवून घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच गावातील नागरिक, शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या.
यावेळी बोलताना आमदार गायकवाड यांनी सांगितले की, “पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही, याची काळजी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. देऊळघाट येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील आणि नागरिकांना दिलासा मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू राहील, असा शब्द गायकवाड यांनी दिला.


