Schedule Announced for Member Reservation Draw for 61 Gram Panchayats in Chikhli Taluka : चिखली तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

बुलढाणा, दि. ४ : राज्य निवडणूक आयोगाच्या २६ मे २०२६ रोजीच्या आदेशानुसार राज्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार चिखली तालुक्यातील ६० मुदत संपणाऱ्या आणि एका नव्याने स्थापन झालेल्या अशा एकूण ६१ ग्रामपंचायतींसाठी प्रभागनिहाय सदस्य आरक्षण निश्चित करण्यासाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायत सदस्य पदांच्या आरक्षणाची प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून यासाठी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. या ग्रामसभांमध्ये आरक्षण सोडतीद्वारे विविध प्रभागांतील सदस्य पदांचे आरक्षण निश्चित करण्यात येईल.
१० जून रोजी ३० ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा
दि. १० जून २०२६ रोजी अमडापूर, धोत्रा नाईक, हरणी, बोरगाव काकडे, भोरसा-भोरसी, आमखेड, कवठळ, काटोडा, खैरव, रोहडा, गोद्री, माळशेंबा, पळसखेड दौलत, सोमठाणा, शेलूद, टाकरखेड हेलगा, करवंड, दहिगाव, धोत्रा भणगोजी, पेठ, टाकरखेड मु., अंत्री खेडेकर, मलगी, अमोना, वसंतनगर, शेळगाव आटोळ, मालगणी, अंत्री कोळी, सावरगाव डुकरे आणि केळवद या ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.
११ जून रोजी ३१ ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण प्रक्रिया
दि. ११ जून २०२६ रोजी इसोली, तोरणवाडा, वैरागड, तेल्हारा, एकलारा, नायगाव बु., गांगलगाव, भालगाव, कोलारा, चांधई, खोर, साकेगाव, येवता, दिवठाणा, सवणा, वळती, शेलसूर, मंगरूळ नवघरे, शेलोडी, शिंदी हराळी, उत्रादा, मेरा बु., मुरादपूर, भरोसा, अंचरवाडी, मंगरूळ इ., देऊळगाव धनगर, हातणी, भोगावती, ब्रम्हपुरी आणि किन्होळा येथे विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
सर्व विशेष ग्रामसभा अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात पार पडणार असून, ग्रामपंचायत सदस्य पदांच्या प्रभागनिहाय आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत. आरक्षण प्रक्रिया पारदर्शक व लोकाभिमुख पद्धतीने पार पडावी यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजय सवडे यांनी केले आहे.
आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/
या आरक्षण सोडतीनंतर संबंधित ग्रामपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रक्रियेला गती मिळणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.


