Santosh Bhutekar’s follow-up efforts bear fruit. : संतोष भुतेकरांच्या पाठपुराव्याला यश; काळोणा गावात विकासकामांचा शुभारंभ

बुलढाणा प्रतिनिधी : चिखली तालुक्यातील काळोणा गावातील नागरिकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि आंदोलनाला अखेर यश आले असून गावातील स्मशानभूमी शेड व स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी एकूण १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन व उद्घाटन गुरुवारी करण्यात आले.
काळोणा हे गाव अनेक वर्षांपासून विविध मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले होते. गावाचे नाव अधिकृत नकाशांमध्ये नसल्यामुळे अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये होती. या प्रश्नांसाठी गावकऱ्यांनी वेळोवेळी आवाज उठविला असून विविध माध्यमांतून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
गावातील प्रश्न सोडविण्यासाठी युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आंदोलन, निवेदने आणि ग्रामस्थांना एकत्रित करून गावाच्या विकासाचा मुद्दा प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. ग्रामस्थांच्या मागण्यांना प्रतिसाद देत सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांच्या निधीतून स्मशानभूमी शेडसाठी ५ लाख रुपये आणि स्मशानभूमी पोहोच रस्त्यासाठी ५ लाख रुपये असा एकूण १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
उपोषणादरम्यान दिलेला शब्द पूर्ण करत आमदार मनोज कायंदे यांच्या वतीने सुभाष दराडे यांनी गावकऱ्यांना निधी मंजुरीची माहिती दिली. त्यानंतर दि. ४ जून रोजी संबंधित कामांचे उद्घाटन करण्यात आले. या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून गावाच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी उपस्थित असलेले नायब तहसीलदार गायकवाड यांनी काळोणा गाव दत्तक घेण्याची घोषणा केली. गावातील विविध प्रशासकीय समस्या आणि शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. “गावातील कोणतीही समस्या असल्यास नागरिकांनी थेट संपर्क साधावा. समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून शक्य ती मदत केली जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.
तसेच, गावाच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल संतोष भुतेकर यांच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले. ग्रामस्थांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून त्यांच्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले.
स्मशानभूमी उद्घाटन कार्यक्रमास सुभाष दराडे, नायब तहसीलदार गायकवाड, युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विशाल थुट्टे, सामाजिक कार्यकर्ते संतोष आटोळे, सरपंच मल्लूशेठ विलास गाडेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काळोणा गावाच्या विकासासाठी प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाल्याने परिसरात आशावादी वातावरण निर्माण झाले असून, पुढील काळात इतर मूलभूत प्रश्नही मार्गी लागतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


