Special prayers marking the 12-year tenure of the Modi government. : मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त विशेष पूजन; शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी मेहकरच्या श्री शारंगधर बालाजी चरणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची मनोभावे आरती

बुलढाणा (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला बारा वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निरंतर देशसेवेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी मेहकर येथील श्री शारंगधर बालाजी महाराजांच्या चरणी विशेष प्रार्थना करण्यात आली. यावेळी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी श्री शारंगधर बालाजी महाराजांची मनोभावे आरती करून पंतप्रधानांच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग बारा वर्षे देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळत देशाच्या विकासाला नवी दिशा दिली आहे. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधत जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विकसित भारताच्या संकल्पनेला गती देत देशाला आत्मनिर्भरतेच्या मार्गावर नेण्यात मोदी यांच्या नेतृत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या निमित्ताने १२ जून रोजी मेहकर येथील श्री शारंगधर बालाजी मंदिरात विशेष पूजन व आरतीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी श्रींच्या चरणी नतमस्तक होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्याची तसेच राष्ट्रसेवेच्या अखंड कार्यासाठी प्रार्थना केली.

यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, शिवसेना उपजिल्हा संघटक दिलीपराव देशमुख, शिवसेना उपजिल्हा प्रमुख किसनराव बळी, तालुका प्रमुख सुरेश वाळुकर, शहरप्रमुख जयचंद बाढीया, भाजप नेते डॉ. सुभाष लोहिया, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बबनराव भोसले, बबनराव तुपे, रामेश्वर म्हस्के, नगरसेवक ओम सोभागे, विशाल काबरा, मनोज जाधव, मंगेश गायकवाड यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच विकसित भारताच्या संकल्पनेची यशस्वी पूर्तता व्हावी आणि देशाच्या प्रगतीचा वेग अधिक वाढावा, यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.


