Janata Darbar held at Sindkhed Raja in the presence of Union Minister Prataprao Jadhav. : जनतेच्या तक्रारींचा ऑन दि स्पॉट निपटारा: केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत सिंदखेड राजा येथे जनता दरबार

बुलडाणा प्रतिनिधी: सर्वसामान्य जनतेच्या समस्या आणि तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्याच्या उद्देशाने, केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत येत्या 18 जुलै रोजी सिंदखेड राजा येथे भव्य जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या लेखी तक्रारी देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा येथील विशेष तक्रार कक्षात सादर कराव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
केंद्रीय मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर, जनतेच्या समस्यांचा ‘ऑन दि स्पॉट’ निपटारा करण्यासाठी केंद्रीय मंत्री जाधव आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघनिहाय जनता दरबारांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ राष्ट्रमाता जिजाऊंच्या पावन भूमीतून, म्हणजेच सिंदखेड राजा येथून होणार आहे.
सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघासाठीचा पहिला जनता दरबार 18 जुलै रोजी सिंदखेड राजा येथील मातोश्री मंगल कार्यालयात सकाळी 11:00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या दरबारात सिंदखेड राजा मतदारसंघातील जनतेच्या तक्रारी आणि समस्यांचा तात्काळ निपटारा केला जाईल. नागरिकांनी आपल्या तक्रारी 17 जुलैपर्यंत संबंधित तहसील कार्यालयात लेखी स्वरूपात सादर कराव्यात.
नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तहसील कार्यालयांमध्ये विशेष जनता दरबार कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. सिंदखेड राजा येथील तहसील कार्यालयात श्रीमती ज्योती बारवाल (भ्रमणध्वनी क्रं- 7276093269) आणि मनोज देशमुख (भ्रमणध्वनी क्रं- 9823197001) यांच्याशी संपर्क साधता येईल. तर, देऊळगाव राजा तहसील कार्यालयात सहायक महसूल अधिकारी दीपक मोरे (भ्रमणध्वनी क्रमांक 9850814038) आणि बालाजी कौशल्य (भ्रमणध्वनी क्रमांक 9764619420) यांच्याकडे तक्रारी सादर करता येतील.
आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/
17 जुलैच्या सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाच समावेश 18 जुलै रोजी होणाऱ्या जनता दरबारात केला जाईल. त्यामुळे, सर्व नागरिकांनी आपल्या समस्यांचा निपटारा करून घेण्यासाठी तात्काळ संबंधित तहसील कार्यालयातील जनता दरबार विशेष कक्षात आपल्या तक्रारी सादर कराव्यात, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. हा जनता दरबार नागरिकांना थेट मंत्र्यांसमोर आपल्या समस्या मांडण्याची आणि त्यावर तात्काळ तोडगा काढण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे.


