Union Minister of State Prataprao Jadhav issues strict instructions to the administration : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून प्रशासनाला सक्त निर्देश: घरकुल, नरेगा आणि पाणीपुरवठा योजनांना गती देण्याचे आवाहन

बुलडाणा: केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलडाणा जिल्ह्यातील प्रशासनाला धारेवर धरत, घरकुल योजना, नरेगा आणि पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीमध्ये दिरंगाई करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. दिशा समितीच्या बैठकीत बोलताना, जाधव यांनी गरिबांच्या घरांचे स्वप्न साकार करण्यापासून ते शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीच्या पाहणीपर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
घरकुल योजनेला गती देण्याचे आदेश:
जाधव यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधकामाची सद्यस्थिती जाणून घेतली आणि एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. कामाच्या प्रगतीनुसार तातडीने निधी अदा करण्याचे आणि विहिरींची कामेही वेगाने पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले. घरकुल आणि नरेगा योजनेतील तक्रारींची दखल घेत, केवळ कंत्राटी कर्मचाऱ्यांवर जबाबदारी ढकलण्याऐवजी गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांवरही कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांना जिल्हा परिषद स्तरावर बैठक घेऊन सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी केली.

पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना:
पावसाचे प्रमाण कमी असल्याने संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन आराखडे तातडीने तयार करण्याचे निर्देश जाधव यांनी दिले. ‘अमृत’ योजनेअंतर्गत पाणीपुरवठा आणि तलावांची प्रलंबित कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत, तसेच कामांमध्ये दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करावी असेही ते म्हणाले. ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला आणि सुरू असलेल्या कामांना गती देत गुणवत्ता राखण्याचे आवाहन केले.
पीक नुकसानीची पाहणी आणि शेतकऱ्यांना मदत:
शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीची तातडीने पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश जाधव यांनी दिले. ई-पीक पाहणी आणि ई-केवायसी प्रक्रिया शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून पूर्ण करून घ्यावी, तसेच कामात विलंब करणाऱ्यांवर कारवाई करावी असे ते म्हणाले. कोणत्याही शेतकऱ्याला अनावश्यक त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. पावसातील विलंबामुळे पिकांना पाणी देणे आवश्यक असल्याने, शेतकऱ्यांना आवश्यक वीज उपलब्ध होईल याची खात्री करण्याचे आणि वीज उपलब्धतेअभावी पिकांना पाण्याची कमतरता भासू नये याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचा किंवा प्रकारचा मोटार पंप खरेदी करण्याची सक्ती करू नये असेही ना. जाधव यांनी स्पष्ट केले.
विकासकामांना गती देण्याचे आवाहन:
पीएम गतीशक्ती अंतर्गत जिल्ह्यातील जालना-खामगाव नवीन रेल्वे मार्गाशी संबंधित भूसंपादन आणि इतर सर्व प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश जाधव यांनी दिले. यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून विकासकामांना गती द्यावी असे ते म्हणाले. केंद्र शासनाच्या योजनांची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे आणि योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून कामांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.


