Be committed to quality education. : गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध व्हा: विकास पाटील यांचे शिक्षकांना आवाहन

बुलढाणा (प्रतिनिधी): आगामी शैक्षणिक वर्षाच्या उंबरठ्यावर, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण, मूल्यधिष्ठित आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. शाळा, वर्ग आणि विद्यार्थी या त्रिसूत्रीचा अवलंब करून कटिबद्धतेने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. बुलढाणा पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांसाठी आयोजित एकदिवसीय उद्बोधन कार्यशाळेत ते बोलत होते.

या कार्यशाळेत उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर, गटशिक्षणाधिकारी चेतन वाडीले, शिक्षण विस्तार अधिकारी वंदना टाकळकर, दत्ता क्षिरसागर आणि तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते. पाटील यांनी शिक्षकांना “समाज परिवर्तनाचा केंद्रबिंदू” असे संबोधत, केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यापलीकडे जाऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार, नवोपक्रम आणि मूल्यशिक्षण यांवर विशेष भर देण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी, निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शिक्षकांच्या विविध अडचणी आणि प्रशासकीय स्तरावरील प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले, परंतु त्याचबरोबर शिक्षकांनी आपला संपूर्ण वेळ शालेय गुणवत्ता वाढीसाठी द्यावा अशी अपेक्षाही व्यक्त केली.
मिशन झेप-ZEP (झेडपीज एज्युकेशनल पायोनिअर) अंतर्गत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शहरांकडे असलेला ओढा थांबवून, गावातील शंभर टक्के विद्यार्थ्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यशाळेत विद्यार्थी सुरक्षा उपाययोजना, शाळेच्या पहिल्या दिवसाचा प्रवेशोत्सव, पुस्तक व गणवेश वाटप, विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाला गती देणे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
पंचायत समिती बुलढाणा अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षक या कार्यशाळेत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी चेतन वाडीले यांनी केले, सूत्रसंचालन केंद्रप्रमुख रमेश यंगड यांनी केले, तर आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख सोनूने यांनी केले.


