Buldhana District to be named ‘Rajmata Jijau Nagar’ and the Medical College ‘Dr. Ambedkar’: बुलढाणा जिल्ह्याला ‘राजमाता जिजाऊ नगर’ व मेडिकल कॉलेजला ‘डॉ. आंबेडकर’ नाव.

बुलढाणा, दि. १६ – बुलढाणा जिल्हा हे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान असल्याने जिल्ह्याचे नामांतर ‘राजमाता जिजाऊ नगर’ करण्यात यावे आणि येथील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असून, त्यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जिल्ह्याचे नामांतर ‘राजमाता जिजाऊ नगर’ केल्यास महसूल नकाशा व शासकीय नोंदींमध्ये जिजाऊ माँसाहेबांचे नाव कोरले जाईल आणि जिल्हा ‘राजमाता जिजाऊ नगर’ म्हणून ओळखला जाईल. यामुळे ऐतिहासिक वारसा जपला जाईल आणि पर्यटनाला चालना मिळेल.
तसेच, बुलढाणा येथे नवीन सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३९ व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे नाव देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. हे नाव दिल्यास दलित, बहुजन समाजाच्या भावनांचा आदर होईल आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात आंबेडकरी विचारांचा प्रसार होईल.
या निवेदनासाठी प्रा. इंजिनियर भैयासाहेब पाटील (भिमरत्न पुरस्कार प्राप्त, समाजभूषण), जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना भेट देऊन निवेदन सादर केले. यावेळी तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, माजी सैनिक, पत्रकार, बौद्ध महासभा प्रतिनिधी, मराठा नेते आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपाई आठवले गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख बाबासाहेब जाधव यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनभावनांचा आदर करून या मागण्यांचा सकारात्मक विचार करतील, अशी अपेक्षा आहे. लवकरच पक्षाचे शिष्टमंडळ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना भेटून मागणी मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


