Karvand Village in Buldhana District Granted Tourism स्टेटस : बुलडाणा जिल्ह्यातील करवंड गावाला पर्यटनाचा दर्जा

बुलडाणा, दि. १६ मार्च – महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात एक नवीन अध्याय जोडला गेला आहे. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार तथा विकासमूर्ती श्वेताताई महाले (पाटील) यांच्या अथक प्रयत्नांमुळे बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड (पूर्वीचे बावनबुर्जी) गाव राज्याच्या पर्यटन नकाशावर आले आहे. या ऐतिहासिक ठिकाणाला पर्यटनाचा दर्जा मिळवून देण्यात आला असून, येत्या १५ एप्रिल २०२६ रोजी येथे शिवविवाह स्मृती भव्य ऐतिहासिक महोत्सव साजरा केला जाणार आहे. या निर्णयाची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अशिषी शेलार यांनी केली आहे.
करवंड हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबीय इतिहासाशी जोडलेले आहे. पूर्वी या गावाला बावनबुर्जी असे ओळखले जायचे, कारण येथे ५२ बुर्ज असलेली भव्य तटबंदी होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सासराशी संबंधित असलेले हे ठिकाण ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. काळाच्या ओघात बहुतांश बुर्ज नष्ट झाले असले तरी उरलेल्या अवशेषांमधून (जसे की दोन बुर्ज, प्राचीन विहीर, घुमट, लाकडी राजवाडा आणि नक्षीकाम) या गावाचा वैभवपूर्ण इतिहास जाणवतो. आमदार श्वेताताई महाले यांनी विधानसभेत सातत्याने याबाबत आवाज उठवला आणि राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून हा पर्यटन दर्जा मिळवला.
या निर्णयामुळे बुलडाणा जिल्ह्यातील पर्यटनाला नवी दिशा मिळाली आहे. लोणार सरोवर, सिंदखेड राजा, शेगाव, भोन यांसारख्या ऐतिहासिक स्थळांमध्ये आता करवंड हे एक आकर्षण ठरेल. यामुळे स्थानिक उद्योजकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
या उपलब्धीबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या वतीने जिल्हा संपर्क प्रमुख बाबासाहेब जाधव, प्रा. इंजिनियर भैयासाहेब पाटील, चिखली तालुकाध्यक्ष हिम्मराव जाधव, केशवराव सरकटे, बाळासाहेब आहीरे, विदर्भ महिला अध्यक्ष आशाताई वानखडे यांच्यासह अनेक नेत्यांनी आमदार श्वेताताई महाले यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या भावी विकास कामांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


