mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

पारंपरिक रूढींना फाटा! वडिलांना पर्यावरणपूरक श्रद्धांजली : Eco-friendly tribute to father

शेअर करा :

Eco-friendly tribute to father : चिखली येथील प्राध्यापक सुनील डुकरे यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर सर्व पारंपरिक रूढींना फाटा देत एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.


Eco-friendly tribute to father
Eco-friendly tribute to father
डुकरे परिवाराने जपला आदर्श
बुलढाणा : चिखली येथील प्राध्यापक सुनील डुकरे यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर सर्व पारंपरिक रूढींना फाटा देत एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. वृक्षारोपण, गोवऱ्यांचा वापर आणि स्मशानभूमीसाठी दातृत्व दाखवत त्यांनी वडिलांना खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक श्रद्धांजली अर्पण केली.
एक आदर्श आणि उत्कृष्ट शिक्षक म्हणून ओळखले जाणारे स्व. गुलाबराव सोनाजी डुकरे (वय ७० वर्षे) यांचे ३ मे २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रात आणि भादोला परिसरात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर भादोला येथे अंतिम संस्कार करण्यात आले.
सामान्यतः अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर केला जातो, ज्यामुळे वृक्षतोडीला खतपाणी मिळते. ही बाब लक्षात घेऊन प्रा. सुनील डुकरे यांनी वडिलांना चिताग्नी देण्यासाठी लाकडाचा वापर पूर्णपणे टाळला. त्याऐवजी त्यांनी गोवऱ्यांचा वापर करून अंत्यविधी पार पाडला. या कृतीतून त्यांनी पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी सिद्ध केली.
आजच्या काळात अस्थी किंवा रक्षा विसर्जन करण्यासाठी नदीपात्राचा वापर केला जातो, ज्यामुळे जलप्रदूषण वाढते. मात्र, डुकरे सरांनी ५ मे रोजी झालेल्या रक्षाविसर्जनाच्या वेळी रक्षा नदीत न टाकता आपल्या स्वतःच्या शेतात विसर्जित केली. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी रक्षा विसर्जित केली, त्याच ठिकाणी वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी वृक्षारोपण करून एक जिवंत स्मारक उभे केले आहे.
स्मशानभूमीसाठी ५१ हजारांची देणगी
केवळ पर्यावरणच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपत प्रा. सुनील डुकरे यांनी भादोला येथील आदर्श स्मशानभूमीच्या विकासासाठी ५१,००० रुपयांची देणगी जाहीर केली आहे. तसेच, मृत्यूशी संबंधित असणारे महिनाभराचे लांबलचक विधी न करता, सर्व विधी केवळ पाच दिवसांत आटोपून त्यांनी विज्ञानाभिमुख दृष्टिकोन जोपासला आहे.
प्राध्यापक डुकरे यांनी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे आणि सामाजिक क्रांतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, हा उपक्रम इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top