Electricity connections of 29,000 defaulters cut : मिशन ९० दिवसाअंतर्गत सुरू केलेल्या शून्य थकबाकी मोहिमेत परिमंडलातील साडेतीन लाखांहून अधिक ग्राहकांकडे थकीत असलेल्या सव्वाशे कोटी रुपयांच्या वीजबिल वसुलीसाठी महावितरणने सुरू केलेली धडक मोहीम अधिक गतीमान केली आहे. परिमंडळात मोहिमत जवळपास २९ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.


मुख्य अभियंता राजेश नाईक वीजबिल वसूलीसाठी रस्त्यावर
……………………………………..
महावितरणची कारवाई : वीजबिल वसुली मोहिमेस गती
बुलढाणा : मिशन ९० दिवसाअंतर्गत सुरू केलेल्या शून्य थकबाकी मोहिमेत परिमंडलातील साडेतीन लाखांहून अधिक ग्राहकांकडे थकीत असलेल्या सव्वाशे कोटी रुपयांच्या वीजबिल वसुलीसाठी महावितरणने सुरू केलेली धडक मोहीम अधिक गतीमान केली आहे. परिमंडळात मोहिमत जवळपास २९ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ग्राहकांनी चालू बिलासह थकबाकी भरून सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले आहे.
अकोला परिमंडलात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक वर्गवारीतील एकूण ३ लाख ५३ हजार ९२ ग्राहकांकडे १२४ कोटी ५० लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. अकोला जिल्ह्यातील १ लाख १९ हजार ५६३ ग्राहकांकडे ४५ कोटी २६ लाख, बुलढाणा जिल्ह्यातील १ लाख ६२ हजार ८२३ ग्राहकांकडे ५७ कोटी १७ लाख व वाशिम जिल्ह्यातील ७९ हजार ७०६ ग्राहकांकडे २२ कोटी ०७ लाख रुपयांची थकबाकी आहे.
शून्य थकबाकीसाठी महावितरणने जानेवारीपासून मिशन ९० दिवस मोहीम राबविण्यात आली आहे. मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते, तांत्रिक कर्मचारी या मोहिमेत प्रत्यक्ष ग्राहकांकडे भेट देऊन थकबाकी वसुलीसाठी सरसावले आहेत.
महावितरणने वीजबिल वसूलीसाठी केलेल्या धडक कारवाईत ४४ कोटी रूपयाच्या थकबाकीसाठी २८ हजार ९१४ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील ६ हजार ९१५ वीज ग्राहकांचा समावेश असून त्यांच्याकडे ९ कोटी ६४ लाख रूपये थकीत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील १५ हजार ७८५ ग्राहकांचा वीजपुरवठा २८ कोटी ८७ लाखासाठी खंडित करण्यात आला आहे व वाशिम जिल्ह्यातील यात ६ हजार २१४ ग्राहकाचा समावेश असून ६ कोटी २० लाखासाठी त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
सामूहिक कारवाईला गती
वीज बिल वसूलीसाठी ज्या गावात प्रतिसाद मिळत नाही, त्या गावात सामूहिक मोहीम राबवत थेट मीटर काढून आणण्याची कारवाई केली जात आहे. मुख्य अभियंता राजेश नाईकसह संबंधित वरिष्ठ अधिकारीही सामूहिक कारवाईत सहभागी होत आहे. मीटर काढून आणल्यानंतर ग्राहक अनधिकृतरित्या वीज वापरत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
सुट्टीच्या दिवशी बिल वसूली आणि बिल भरणा केंद्रे सुरू
आर्थिक वर्षाचे केवळ २१ दिवस बाकी आहे. त्यामुळे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील वीजबिल वसूली मोहिम सुरू ठेवली आहे. तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे आणि ऑनलाइन बिल भरण्याची सुविधाही सुरू ठेवण्यात आली आहे.तरी परिमंडलातील सर्व ग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिले भरून सहकार्य करावे व संभाव्य गैरसोय टाळण्याचे आवाहन मुख्य अभियंता यांनी केले आहे.
वीजबिलासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही
ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करण्यासाठी रांगेत उभे रहावे लागू नये, त्यांचा वेळ वाचावा, यासाठी महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यूपीआय नेट बँकिंग, वॉलेट्स, मोबाईलमधील फोन पे, गुगल पे आदी ॲप्स आणि महावितरणच्या वेबसाइटद्वारे घरबसल्या वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वीजबिलावरील क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट बिल भरता येते. तसेच वीजबिल मुदतीत व ऑनलाइन भरल्यास बिलावर जवळपास १.२५ टक्के सूट मिळत आहे.
डिस्कनेक्शनचा मनस्ताप व रिकनेक्शनचा भुर्दंड टाळा
महावितरणने आपले वीज कनेक्शन तोडण्याची वाट न पाहता ग्राहकांनी चालू महिन्याच्या वीजबिलासह थकबाकीची रक्कम विनाविलंब भरून सहकार्य करावे. थकबाकीसाठी कनेक्शन तोडल्यास बिलाच्या रकमेसह पुनर्जोडणी शुल्क भरावे लागते. सिंगल फेज जोडणीसाठी ३१० रुपये तर थ्री फेजजोडणीसाठी ५२० रुपये पुनर्जोडणी शुल्क आकारले जाते. हा भुर्दंड टाळण्यासाठी वेळेत वीजबिल भरणे आवश्यक असल्याचे महावितरणने म्हटले आहे.
शेजाऱ्यांना अनधिकृत वीज देणे पडेल महागात
थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर काहीजण शेजाऱ्यांकडून वीजपुरवठा घेतात. परंतु हे बेकायदेशीर आहे. असे प्रकार आढळल्यास संबंधितांवर वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे तसेच अनधिकृत वीज देणाऱ्या शेजाऱ्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. एखाद्या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर संबंधित ग्राहकाचे शहरात जिथे दुसरे कनेक्शन असल्यास त्यावर थकबाकी वळवली जाणार आहे.


