Enumerators’ Ordeal Without Census Kits : जनगणना किटविना प्रगणकांची अग्निपरीक्षा

डोणगाव : संपूर्ण देशात १६ मे पासून जनगणनेचा पहिला टप्पा, अर्थात घरगणनेला प्रारंभ झाला. मात्र, या राष्ट्रीय कार्यासाठी नियुक्त केलेल्या हजारो प्रगणकांना शासनाकडून आवश्यक किटच मिळालेली नाही. परिणामी, रणरणत्या उन्हात मिळेल त्या पिशवीत जनगणनेचे साहित्य घेऊन हे प्रगणक आपले कर्तव्य बजावत आहेत.
जनगणना हे केवळ आकडेवारी गोळा करण्याचे काम नसून, ते देशाच्या भविष्याची दिशा ठरवणारे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची एक विशिष्ट ओळख असावी, यासाठी शासनाने प्रगणक आणि पर्यवेक्षक यांच्यासाठी खास किटची योजना आखली होती. या किटमध्ये लोगो असलेली पाठीवरची बॅग, उन्हापासून संरक्षणासाठी लोगो असलेली पांढरी कॅप, लिहिण्यासाठी डायरी, पेन, मार्कर पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर, आय कार्ड होल्डर आणि लोगो असलेली रिबीन यांचा समावेश होता. घरगणना सुरू होण्यापूर्वीच ही किट कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. काही तालुक्यांमध्ये पर्यवेक्षकांना तुरळक किट मिळाल्या असल्या तरी, प्रत्यक्ष घराघरात फिरणाऱ्या प्रगणकांना मात्र अजूनही या किट मिळालेल्या नाहीत.
प्रगणकांना किट न मिळण्यामागचे कारण शोधले असता, असे समजले की या सर्व किट दिल्लीहून पोस्टाद्वारे येणार आहेत आणि त्यानंतर त्यांचे वाटप प्रगणकांना केले जाईल. जोपर्यंत या किट येत नाहीत, तोपर्यंत त्या दिल्या जाऊ शकत नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले. काम थांबू नये यासाठी मेहकर जनगणना विभागाने मार्कर पेन खरेदी करून प्रगणकांना दिले आणि कामाला सुरुवात केली. ही तात्पुरती व्यवस्था असली तरी, यामुळे प्रगणकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्याच्या काळात कोणतीही व्यक्ती प्रगणक असल्याचे भासवून गैरफायदा घेऊ शकते. अशा तोतया लोकांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे आणि प्रगणकांची विश्वासार्हता कायम राहावी यासाठी त्यांची एक वेगळी ओळख असणे अत्यंत आवश्यक आहे. किटमधील लोगो असलेली बॅग, कॅप आणि ओळखपत्र यामुळे प्रगणकांची ओळख सहजपणे पटू शकते आणि कामात पारदर्शकता येऊ शकते.
शासनाने १६ मे पासून घरगणना सुरू करण्याचे निश्चित केले होते. अशा राष्ट्रीय महत्त्वाच्या कामासाठी आवश्यक असलेले साहित्य वेळेपूर्वीच प्रगणकांपर्यंत पोहोचणे अपेक्षित होते. असे असतानाही, घरगणनेला सुरुवात झाल्यानंतरही साहित्य उपलब्ध नसणे, हे शासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. यावरून घरगणनेच्या कामासाठी शासन किती तत्पर आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. प्रगणकांना आवश्यक सुविधा पुरवून त्यांचे काम अधिक सुकर करणे, हे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण जनगणनेच्या यशस्वीतेसाठी महत्त्वाचे आहे.


