Fund of Rs 2 crore approved for Palashi Jhansi pilgrimage site : पळशी झाशी तीर्थस्थळाला दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर

बुलढाणा, दि. १६ मार्च – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ विकास योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पळशी झाशी येथील महंत श्री शंकरगिरी महाराज संस्थानला दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमुळे तीर्थस्थळाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असून, भाविकांच्या सोयीसाठी भव्य सभागृह, प्रसादालय व इतर मूलभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत.
पळशी झाशी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत पांडव नदीच्या काठावर वसलेले हे गाव स्वयंभू शिवलिंग आणि महंत श्री शंकरगिरी महाराज यांच्या समाधीमुळे विशेष प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीनिमित्त येथे होणारी यात्रा आणि ९-१० क्विंटलचा महारोठ (रोडगा) तयार करण्याची शतकानुशतके जुनी परंपरा भाविकांना आकर्षित करते. या संस्थेला राज्य सरकारकडून ‘ब’ दर्जाचे तीर्थक्षेत्राचा दर्जाही प्राप्त झाला आहे.
केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव आणि या मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांनी या निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, १३ मार्च रोजी शासन निर्णयाद्वारे हा निधी मंजूर झाला. या विकास निधीमुळे तीर्थक्षेत्र अधिक सुसज्ज होऊन भाविकांची संख्या वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या यशस्वी पाठपुराव्याबद्दल आणि दिलेल्या शब्दाची पूर्तता केल्याबद्दल संस्थेचे विश्वस्त अरुण पाटील मोरोडे यांनी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन सन्मानपूर्वक सत्कार केला. सत्कारप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, भाविक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निधीमुळे पळशी झाशी तीर्थक्षेत्राच्या विकासाला नवी दिशा मिळाली असून, ग्रामीण भागातील धार्मिक व पर्यटन स्थळांच्या उन्नतीसाठी ही योजना फलदायी ठरत असल्याचे दिसून येते.


